मुंबई : कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मॉल परिसरातील मुंबई महापालिकेच्या प्रमोद महाजन उद्यानात तरुण-तरुणीला टोळक्याने केलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शहरातील उद्यानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उद्यानातील सुरक्षेचा अभाव, कंत्राटदाराचा हलगर्जीपणा आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पाहता बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष हेतल गाला यांनी प्रशासनाला धारेवर धरले. उद्यानाच्या देखभालीसाठी दोन वर्षांत तब्बल ७० लाख रुपये खर्च करूनही उद्यानाची दुरवस्था झाली असल्याने संबंधित कंत्राटदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाका व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला आणि आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी बुधवारी या उद्यानाची पाहणी केली. यावेळी उद्यानातील अस्वच्छता, तुटलेली संरक्षक जाळी, बंद शौचालय आणि सुरक्षेचा अभाव अशा अनेक त्रुटी उघड झाल्या. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच गाला यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारत, उद्यानाच्या मुख्य रस्त्यावरून थेट प्रवेश का उपलब्ध करून दिला नाही? मॉलच्या जागेतूनच प्रवेशाची व्यवस्था का ठेवण्यात आली? उद्यानाची देखभाल व्यवस्थित का झाली नाही? मारहाण करणाऱ्या टोळक्याच्या हातात बांबू आणि काठ्या कुठून आल्या? सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करत होती? असे सवाल उपस्थित केले.
...तरीही उद्यानाची दुरवस्था
उद्यानाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दोन वर्षांसाठी महापालिकेने ७० लाख रुपये दिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत उद्यानात कोणतीही समाधानकारक कामे झाल्याचे दिसून आले नाही. जी काही कामे झाली आहेत, त्यांचीही अवस्था बिकट आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले. उद्यानाच्या झोपडपट्टीच्या बाजूकडील लोखंडी संरक्षक जाळी तोडण्यात आली असून, त्या मार्गाने स्थानिक मुले उद्यानात प्रवेश करतात. एवढेच नव्हे, तर झोपडपट्टीतून सांडपाणी, मलजल आणि कचरा उद्यानात टाकला जात असल्याचेही पाहणीत उघड झाले. उद्यानातील सार्वजनिक शौचालयही बंद अवस्थेत आहे.
पालिका प्रशासनाची चालढकल
उद्यानाच्या हद्दीत कचरा टाकणाऱ्या आणि सांडपाणी सोडणाऱ्या झोपडीधारकांना मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम ३८१ अन्वये नोटिसा बजावण्यात येतील, असे उपायुक्त अजितकुमार अंबी यांनी स्पष्ट केले. आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनीही प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. उद्यानाच्या सुरक्षेचा आणि दुरवस्थेचा प्रश्न आपण २०२३ पासून सातत्याने मांडत आहोत. मात्र, प्रशासनाकडून केवळ चालढकल करण्यात आली आणि कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला.