Mumbai : कुर्ल्यात क्रेन कोसळून १० जखमी; कंत्राटदाराला २५ लाखांचा दंड; MMRDA ची कारवाई

कुर्ला पूर्व येथील इंदिरानगर परिसरात शुक्रवारी भल्या पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एका बांधकामस्थळी हायड्रॉलिक क्रेनचा भाग कोसळला.
Mumbai : कुर्ल्यात क्रेन कोसळून १० जखमी; कंत्राटदाराला २५ लाखांचा दंड; MMRDA ची कारवाई
Mumbai : कुर्ल्यात क्रेन कोसळून १० जखमी; कंत्राटदाराला २५ लाखांचा दंड; MMRDA ची कारवाई (Photo-X)
Published on

मुंबई : कुर्ला पूर्व येथील इंदिरानगर परिसरात शुक्रवारी भल्या पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एका बांधकामस्थळी हायड्रॉलिक क्रेनचा भाग कोसळला. या दुर्घटनेत ३ महिन्यांच्या चिमुरड्यासह १० जण जखमी झाले असून या जखमींवर कुर्ला भाभा व सायन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, क्रेनचा काही भाग रेल्वेच्या मालगाडीच्या रुळांवरील ओव्हरहेड वायरवर तसेच लगतच्या झोपड्या, रस्ता, म्हाडाच्या इमारतीची संरक्षक भिंत आणि वाहनांवर कोसळला. या प्रकरणी ‘एमएमआरडीए’ने कंत्राटदाराला २५ लाखांचा दंड ठोठावला कुर्ला पूर्व येथील इंदिरा नगर बंटर भवन, गॅलक्सी इमारतीच्या मागे म्हाडाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात येणार होती. त्यासाठी एका हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने पोकलेन मशीन १७ मजली बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या वरच्या भागात नेण्याचे काम सुरू होते. यावेळी क्रेनचा काही भाग तुटून जवळील रेल्वेच्या उच्चदाब    वीजवाहिन्या, कुरेशी नगरमधील झोपड्या, सम्राट अशोक नगर मार्ग, म्हाडा इमारतीची संरक्षक भिंत तसेच आवारात उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांवर कोसळला.

जखमींवर सायन, भाभा रुग्णालयात उपचार

या दुर्घटनेतील जखमींपैकी आठ जणांना सायन रुग्णालयात तर दोन जणांना कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायन रुग्णालयातील जखमींमध्ये जगरुल्ला नबी मोहम्मद खान (६३), अहमद नियाज अहमद (३ महिने), अतिकूर रहमान (६०), हाकूम शेख (३६), नुमान खान (२१), रहमान खान (१९), सूरज गौर (१०) आणि अकबर (४०) यांचा समावेश आहे. तर कुर्ला भाभा रुग्णालयात राजू गौर (३५) आणि आरती गौर (३०) यांच्यावर उपचार सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला–ट्रॉम्बे सिंगल लाईनवर क्रेनचा भाग पडला असला तरी हा मार्ग प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी वापरला जात असल्याने रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत असुरक्षित

ही इमारत २००५ मध्ये मे. एचडीआयएलमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आली होती. तळमजला अधिक १६ मजले असलेल्या या आरसीसी निवासी इमारतीमध्ये सहा विंग आणि सुमारे ५०० सदनिका आहेत. मात्र, प्रकल्पाचे काम अपूर्ण राहिल्याने इमारत नियमित वास्तव्यासाठी अथवा वापरासाठी कार्यान्वित करण्यात आली नव्हती. विकासक आर्थिक अडचणीत आल्यानंतर अपूर्ण अवस्थेतील ही इमारत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून एमएमआरडीएकडे ‘जशी आहे, जिथे आहे’ तत्त्वावर हस्तांतरित करण्यात आली. इमारतीचे वय, अपूर्ण अवस्था आणि संरचनात्मक स्थिती लक्षात घेऊन ‘एमएमआरडीए’ने २०२१ मध्ये तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. त्यामध्ये इमारत वास्तव्यास योग्य नसल्याचे निष्पन्न झाले होते. या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशींच्या आधारे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारत पाडण्याची प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया ‘एमएमआरडीए’ने सुरू केली. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मे. टोटल कन्स्ट्रक्शन प्रा. लि., नवी दिल्ली या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती.

मॅन्युअल पद्धतीने पाडकाम होते अपेक्षित

या इमारतीचे पाडकाम मॅन्युअल पद्धतीने करणे अपेक्षित होते. मात्र, पोकलेन मशीन वर नेण्यासाठी हायड्रॉलिक क्रेनचा वापर करण्यात आला असताना ही दुर्घटना घडली. त्यामुळे कामाच्या पद्धतीसह सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही तपास केला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in