Mumbai : कुर्ला उन्नत मार्गाच्या कामात दिरंगाई; प्रकल्प एक वर्ष लांबणीवर; कंत्राटदारावर रेल्वे मेहरबान

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वेकडे कुर्ला उन्नत मार्गाबाबत विविध माहिती विचारली होती.
कुर्ला उन्नत मार्गाच्या कामात दिरंगाई; प्रकल्प एक वर्ष लांबणीवर
कुर्ला उन्नत मार्गाच्या कामात दिरंगाई; प्रकल्प एक वर्ष लांबणीवरसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : कुर्ला उन्नत मार्ग प्रकल्पाचे काम मध्य रेल्वेने मेसर्स वालेचा आरई इन्फ्रा (जेव्ही) या कंत्राटदाराला दिले आहे. कामात दिरंगाई झाली असून सुरुवातीला प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध अडचणींमुळे अंतिम कालावधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आला. तर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रकल्पाच्या विलंबासाठी कंत्राटदाराला कोणताही दंड आकारलेला नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वेकडे कुर्ला उन्नत मार्गाबाबत विविध माहिती विचारली होती. मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता रोहित मेहता यांनी त्यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार कुर्ला उन्नत मार्गाचे काम कंत्राटदार मेसर्स वालेचा आरई इन्फ्रा (जेव्ही) यांस दिले आहे. या प्रकल्पाचा कार्य आदेश १४ जानेवारी २०१६ रोजी देण्यात आला. विविध कारणांनी हा प्रकल्प रखडल्याने सद्यस्थितीत प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आला आहे. गलगली यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाव्यवस्थापक यांस लिहिलेल्या पत्रात प्रकल्पातील दिरंगाई आणि कंत्राटदारावर दंड न आकारल्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक सुविधांच्या उशिरामुळे प्रवाशांना होणारा त्रास वाढत आहे. वेळेवर प्रकल्प पूर्ण न झाल्यास खर्च वाढण्याची शक्यता आहे. दिरंगाईचे कारण सांगताना रेल्वेने अडचणी असल्याचा दावा आहे.

एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म

कुर्ला उन्नत मार्गात एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म आहे. बुकिंग ऑफिस आणि इतर सुविधांसह मेझानाईन मजला आहे. सर्व फूट ओव्हर ब्रिज आणि नवीन स्टेशन इमारतीला जोडणारा स्कायवॉक आहे. तसेच नवीन स्टेशन इमारत असून एस्केलेटर, लिफ्ट, इत्यादीचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in