

मुंबई : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागविण्यासाठी सप्टेंबर महिन्यात सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. ३ ऑगस्ट रोजी सातही धरणात १३ लाख ३ हजार ५०० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात एल निनोमुळे पावसाने पाठ फिरवली तर पाणीसाठा कमी होऊ शकतो. त्यामुळे सातही धरणात ९०.६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असला तरी १० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत तूर्तास तरी निर्णय झालेला नाही, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ३ ऑगस्ट रोजी १३ लाख ३ हजार ५०० दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. मात्र एल नीनोचा प्रभाव असल्याने ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात धरणातील पाणीसाठा १०० टक्के होत नाही तोपर्यंत १० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत तूर्तास निर्णय नाही, असे ते म्हणाले.
३ ऑगस्ट रोजी पाणीसाठा (द. लि.)
अप्पर वैतरणा - १,८१,९४९
मोडकसागर - १,२८,९२५
तानसा - १,४४,४७५
मध्य वैतरणा - १,७८,३३९
भातसा - ६,३४,०६८
विहार - २७,६९८
तुळशी - ८,०४६
धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस
अप्पर वैतरणा - १००.०० मिमी
मोडकसागर - ९१.०० मिमी
तानसा - १२४.०० मिमी
मध्य वैतरणा - ९७.०० मिमी
भातसा - ७६. ०० मिमी
विहार - ४६.०० मिमी
तुळशी - ११८.०० मिमी