
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडपात व्हीआयपींना दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीविरोधात एका वकीलाने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
वकील अड. आशिष राय यांनी २९ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महिलांवर, लहान मुलांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर "दुर्भावनायुक्त वागणूक" केली जात असून त्यांचे हक्क पायदळी तुडवले जातात.
राय यांनी दावा केला की, शहरातील सर्वाधिक लोकप्रिय गणेश मंडळांपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेताना व्हीआयपींना विशेष वागणूक दिली जाते. परंतु सामान्य नागरिकांना गैरवर्तन आणि मौल्यवान वस्तूंची चोरी यांसारख्या प्रकारांचा सामना करावा लागतो.
तक्रारदाराने या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि अशा घटना टाळण्यासाठी कठोर निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना प्रतिवादी म्हणून नामनिर्देशित केले आहे.
दहा दिवसांच्या सणादरम्यान लाखो भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. यात सेलिब्रिटी आणि नेतेमंडळींचाही समावेश असतो.
तक्रारींना केराची टोपली
वकीलाने असा आरोप केला की, मागील दोन वर्षांपासून मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेल्या लेखी तक्रारींची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे त्यांनी अखेर आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला.