

मुंबई : चौपाट्यांवर मुंबईकर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाइफ गार्ड तैनात करण्यात येतात. यंदा १२६ लाइफ गार्ड विविध समुद्रकिनारी चौपाट्यांवर तैनात करण्यात येणार आहेत. हे लाइफ गार्ड ३ ते ४ किमीचा एरिया कव्हर करतात, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
चौपाट्यांवर लाइफ गार्ड तैनात करण्याचे कंत्राट जून २०२५ मध्ये संपुष्टात आले. प्रस्ताव आणण्यास एक वर्ष उशीर झाला, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा सवाल भाजपचे नगरसेवक स्थायी समिती सदस्य तेजिंदर तिवाना यांनी उपस्थित केला. नगरसेवक नसताना प्रस्ताव मंजूर केला अशी शंका स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी उपस्थित केली. निविदेची मुदत संपण्याआधी प्रस्ताव का आणला नाही, असे काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी म्हणाले.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रस्ताव मंजूर
लाइफ गार्ड यांची नियुक्ती करण्यासाठी साहित्यसह निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. दोन एजन्सीनी प्रतिसाद दिला. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराला नवीन कंत्राटदार येईपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली. अखेर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रस्ताव मंजूर केल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.