दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वेच्या एसी लोकलमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. बदलापूर-सीएसएमटी एसी फास्ट लोकल दादर स्थानकात थांबली खरी, मात्र गाडीचे स्वयंचलित दरवाजेच उघडले नाहीत. त्यामुळे दादरला उतरणारे प्रवासी गाडीतच अडकून पडले आणि...
दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल
Published on

मुंबई : ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वेच्या एसी लोकलमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. बदलापूर-सीएसएमटी एसी फास्ट लोकल दादर स्थानकात थांबली खरी, मात्र गाडीचे स्वयंचलित दरवाजेच उघडले नाहीत. त्यामुळे दादरला उतरणारे प्रवासी गाडीतच अडकून पडले आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळी १०.४२ बदलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या एसी फास्ट लोकलमध्ये ही घटना घडली. नियोजित वेळेनुसार गाडी दादर स्थानकात थांबली, प्रवासी उतरण्यासाठी दरवाजे उघडण्याची वाट बघत होते. पण दरवाजे उघडलेच नाहीत आणि गाडी थेट पुढील भायखळा स्थानकाकडे रवाना झाली. तेथे उतरल्यावर संतप्त प्रवाशांनी मोटरमनला जाब विचारला.

कॅबिनमध्ये तब्बल ७ मोटरमन कसे?- संतप्त प्रवाशांचा थेट सवाल

व्हायरल व्हिडिओंमध्ये प्रवासी मोटरमनसमोर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. काही प्रवासी भायखळा स्थानकात गाडी थांबल्यानंतर नाराजी व्यक्त करत होते. एका व्हिडिओमध्ये प्रवासी थेट विचारताना ऐकू येतो, “दादर स्थानकात दरवाजे का उघडले नाहीत?” याचवेळी कॅबिनमध्ये तब्बल सात मोटरमन कसे काय उपस्थित होते, असा सवालही प्रवाशांनी उपस्थित केला आहे. इतके लोक मोटरमनच्या कॅबिनमध्ये बसून टाइमपास करताय का? अशी संतप्त विचारणाही प्रवासी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं.

एक्स (X) वर मुकेश माखीजा नावाच्या युजरने लिहिलं आहे, दादर स्थानकात पुन्हा एकदा एसी लोकलचे दरवाजे उघडले नाहीत आणि गाडी पुढे निघाली. हे पूर्णपणे हास्यास्पद आहे. १०.४२ बदलापूर–CSMT एसी फास्ट लोकलमध्ये कॅबिनमध्ये सात मोटरमन कसे काय?” सदर एसी फास्ट लोकल बदलापूरहून सकाळी १०.४२ वाजता सुटते आणि सुमारे ११.५५ वाजता Dadar स्थानकात पोहोचते.

प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

एसी लोकलचे दरवाजे न उघडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे एसी लोकलच्या व्यवस्थापनावर आणि एकंदरच मध्य रेल्वेच्या कामकाजावर प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. स्वयंचलित दरवाज्यांची प्रणाली, मोटरमनचा समन्वय आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद याबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या संपूर्ण घटनेबाबत मध्य रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in