पाऊस नसतानाही लोकल विलंबाने, प्रवाशांचे हाल सुरूच

मंगळवारी मुसळधार पाऊस नसताना लोकल वेळेत धावतील, अशी अशा प्रवाशांना होती. मात्र लोकल विलंबाने धावत असल्याने मंगळवारीही प्रवाशांचे हाल झाले. याशिवाय, बुधवारी सकाळीही मध्य रेल्वेच्या प्रवाशांना हाच अनुभव आला. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळच्या अनेक लोकल विलंबाने धावत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाऊस नसतानाही लोकल विलंबाने, प्रवाशांचे हाल सुरूच

मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी आणि सोमवारी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. मंगळवारी मुसळधार पाऊस नसताना लोकल वेळेत धावतील, अशी अशा प्रवाशांना होती. मात्र लोकल विलंबाने धावत असल्याने मंगळवारीही प्रवाशांचे हाल झाले. याशिवाय, बुधवारी सकाळीही मध्य रेल्वेच्या प्रवाशांना हाच अनुभव आला. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळच्या अनेक लोकल विलंबाने धावत असल्याचे चित्र दिसत आहे.

रविवारी मुसळधार पावसामुळे खडवली ते वासिंददरम्यान पाणी भरल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली होती. सोमवारीही मुसळधार पाऊस कायम राहिल्याने मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रुळांवर पाणी तुंबले. त्यामुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा सोमवारी पहाटेपासून ठप्प झाली होती. पाणी तुंबल्याने लोकल सेवा सुरळीत होण्यास रात्री उशीर झाला. तर हार्बर मार्गावर वडाळा येथे पाणी भरल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. हार्बर मार्गावरील लोकलसेवा मंगळवारी पूर्वपदावर आल्या. मात्र मध्य रेल्वेच्या लोकल सकाळी नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंबाने धावत होत्या. प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर १० ते १५ मिनिटे तर काही स्थानकांवर अर्धा तास लोकलची वाट पाहावी लागत होती. सकाळी पीक अवरपासून दुपारपर्यंत कायम होती. विद्याविहार रेल्वे स्थानकांवर दुपारी १.१७ वाजता लावण्यात आलेली लोकल प्रत्यक्षात २.२५ दरम्यान स्थानकात आली. इंडिकेटरवर दर्शविण्यात आलेल्या लोकलची वेळ आणि फलाटांवर दाखल होणाऱ्या लोकल यामध्ये ताळमेळ लागत नव्हता. सोमवारी मेल, एक्स्प्रेस उशिराने धावत असल्याने त्या रिशेड्युल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी जलद मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in