रेल्वे प्रवाशांचे रविवारी होणार 'मेगा' हाल; तिन्ही मार्गांवर ब्लॉक

रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रANI

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे सीएसएमटी येथून सकाळी ११.०४ ते दुपारी २.४६ पर्यंत डाऊन धीमी सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर लोकल वळविण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी ११.१४ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या अप धिमी सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.

सीएसएमटी-चुनाभट्टी स्थानकांदरम्यान ब्लॉक

हार्बर मार्गावर सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल येथून सीएसएमटी / वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे / गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत बंद राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ब्लॉक

पश्चिम रेल्वेने ९ जून रोजी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बो ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत चर्चगेट लोकल वांद्रे / दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटेड / रिव्हर्स करण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in