
मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार १५ ऑक्टोबर रोजी मध्य हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत तिन्ही रेल्वे मार्गावरील काही लोकल उशीराने धावण्याची शक्यता असून, काही लोकल रद्द करण्यात आल्याचे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेच्या कल्याण - ठाणे स्थानकादरम्यान पाचव्या व सहाव्या लाईनच्या कामासाठी शनिवारी रात्री १ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत मेल एक्स्प्रेस गाड्या अप व डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत, तर काही लोकल उशीराने धावण्याची शक्यता आहे.
हार्बर मार्गावर चुनाभट्टी, वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत सीएसएमटी, वडाळा रोड या स्थानकातून वाशी, बेलापूर, पनवेल स्थानकासाठी आणि सीएसएमटी स्थानकातून वांद्रे - गोरेगाव स्थानकासाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील.
तर पनवेल, बेलापूर, वाशी स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि गोरेगाव - वांद्रे स्थानकातून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विशेष लोकल सेवा
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८ ) दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.
मेन लाईन व पश्चिम रेल्वेने प्रवासाची मुभा
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची परवानगी आहे.
सांताक्रुझ- गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ गोरेगाव स्थानकादरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत सांताक्रुझ गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.