
काल कल्याण ते टिटवाळा यादरम्यान धावत्या मुंबई लोकलमध्ये सामान कक्षाच्या बोगीत एका व्यक्तीला मारहाण झाली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ही व्यक्त वृद्ध असून बबन हांडे देशमुख असे त्यांचे नाव होते. गुरुवारी २ मार्चला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी संबंधित एका संशयिताला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबन हांडे देशमुख हे सेवानिवृत्त कर्मचारी असून आंबिवली येथे राहत होते. दुपारी हांडे काही कामानिमित्त कल्याण येथे आले होते. त्यानंतर काम संपवून आपल्या घरी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातून टिटवाळ्याकडे जाणारी गाडी पकडली. यावेळी ते लोकलच्या सामान कक्षाच्या डब्ब्यात चढले होते. त्यावेळी काही व्यक्तींसाबोत गाडीत चढण्यावरुन किंवा बसण्यावरुन वाद झाला. त्यांना जबर मारहाण करण्यात आली. यातच त्यांचा मृत्यू झाला. टिटवाळा रेल्वे स्थानकात ही लोकल पोहचल्यानंतर त्यांचा मृतदेह त्या डब्ब्यात सापडला. या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.