सीएसएमटी स्थानकात सुरक्षेचे तीन तेरा

लगेज स्कॅनिंग मशिन्स बंद, अपघात घडला तर जबाबदार कोण?
सीएसएमटी स्थानकात सुरक्षेचे तीन तेरा

दहशतवादी हल्ला झाला की, खडाडून जागे होणारे रेल्वे प्रशासन आजही गाढ झोपेत आहे. जगासाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या आणि प्रतिदिन लाखो प्रवाशांची, पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाची सुरक्षा आजही वाऱ्यावरच आहे. विविध उपकरणे, तंत्रज्ञानाचा भडीमार असलेल्या सीएसएमटी स्थानकात सुरक्षेच्या नावाने अक्षरशः खेळखंडोबा सुरू असल्याचे प्रतिदिन दिसून येत आहे. स्थानकातील बहुतांश मेटल डिटेक्टर बंद असतानाच आता स्थानकाच्या प्रमुख प्रवेशद्वारांजवळ लावण्यात आलेल्या चारही लगेज स्कॅनिंग मशिन्स बंद असल्याने सुरक्षेच्या नावाने अक्षरशः थट्टा चालवली असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये २६/११ च्या हल्ल्यानंतर तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्याचाच एक भाग म्हणून स्थानकाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दिशेला 'लगेज स्कॅनिंग मशिन्स आणि डोअर मेटल डिटेक्टर' बसविण्यात आले. या डिटेक्टर तसेच मशिन्समधून प्रवासी आणि सामानाची योग्य तपासणी, देखरेखीखाली ये-जा अपेक्षित आहे; मात्र घडतेय उलटेच. स्थानकातील प्रवेशद्वार क्रमांक ४, ५ आणि ६ येथील आरक्षण केंद्र, चौकशी केंद्र आणि तिकीट केंद्राजवळील सर्वच म्हणजे चारही मशिन्स बंद आहेत. कोणताही व्यक्ती सामान घेवून थेट रेल्वे स्थानकात प्रवेश करत आहे. रेल्वे सुरक्षिततेच्या त्रुटीचा फायदा घेवून कोणताही स्फोटक पदार्थ पार्सल करून असामाजिक तत्वांनी घातपातघडला, तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला यांच्याशी संपर्क केला असता, मी सुट्टीवर असल्याने याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत अधिकचे बोलणे टाळले.

मेटल डिटेक्टर आजही बंदच

एकूण १६ डिटेक्टर स्थानकात प्रवेश करताना लावण्यात आले आहेत; मात्र दुर्दैवाने यापैकी ७ हून अधिक डिटेक्टर बंद असल्याचे तैनात आरपीएफ, जीआरपी जवानांकडून सांगण्यात आले. यामुळे या डिटेक्टरचा वापर न करता प्रवासी डिटेक्टरच्या बाजूने ये-जा करत आहेत. याबाबत मागील ९ महिन्यांपासून प्रत्येक १५ दिवसानंतर 'नाल्को' या मेटल डिटेक्टर बनवणाऱ्या कंपनीशी पत्रव्यवहार करत असून, अद्याप याबाबत कोणतीही देखभाल दुरुस्ती करण्यात आले नसल्याचे वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

इंटिग्रेटेड सिक्युरिटी प्लॅनचे काय झाले?

रेल्वे स्थानकाची सुरक्षाव्यवस्था चोख करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 'इंटिग्रेटेड सिक्युरिटी प्लॅन' तयार करण्यात येत आहे. या प्लॅन अंतर्गत 'व्हीआयपी मुव्हमेंट' किंवा चेंगराचेंगरी या सारख्या घटनांच्या वेळी पर्यायी मार्गांची रचना करणे, स्थानक परिसरातील 'सीसीटीव्ही', 'मेटल डिटेक्टर', बॅग स्कॅनरची संख्या वाढविणे, अनधिकृत मार्गाने होणारी घुसखोरी बंद करणे आदी गोष्टींना प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र कोरोनानंतर हा प्लॅन कागदांवरच राहिला आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारची भरती मागील काही वर्षात झाली नसल्याने मनुष्यबळही अपुरे पडत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकाची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफ आणि जीआरपी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी नियोजनबद्ध आराखडा आवश्यक असून त्याची काटेकोर अंमलबजावणी आज गरजेचे आहे.

"सीएसएमटी रेल्वे स्थानकातील बहुतांश डोअर मेटल डिटेक्टर आणि लगेज स्कॅन मशिन्स बंद असल्याचे खरं आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांना कळवले आहे. तसेच डिटेक्टर बनवणाऱ्या नाल्को कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. लगेज स्कॅन मशिन्स बाबत तपासणी केली जाईल."

- टी. आर. मीना, उपनिरीक्षक, आरपीएफ, सीएसएमटी

"मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे सीएसएमटी रेल्वे स्थानक नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिले आहे. एक दहशतवादी हल्ला देखील सीएसएमटी स्थानकाने अनुभवला आहे. मात्र तरी देखील या स्थानकातील सुरक्षा राम भरोसे आहे ही बाब गंभीर आहे. स्थानकातील डिटेक्टर, लगेज स्कॅनिंग मशिन्स बंद आहेत हे धक्कादायक आहे. मी स्वतः पाहणी केली आहे. तात्काळ रेल्वे पोलीस प्रशासनाने याची दखल घेत तांत्रिक दुरुस्ती करावी."

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in