Mumbai : लोकलमध्ये किरकोळ वाद, प्राध्यापकाची हत्या; आरोपी ओमकार शिंदेला २४ तासात अटक, थरार CCTV मध्ये कैद

कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक कुमार सिंह (३३) यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याप्रकरणी आरोपी ओमकार एकनाथ शिंदे (२७) याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी अटकेला दुजोरा दिला. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी, बोरिवली यांनी आरोपीला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Mumbai :  लोकलमध्ये किरकोळ वाद, प्राध्यापकाची हत्या; आरोपी ओमकार शिंदेला २४ तासात अटक, थरार CCTV मध्ये कैद
Published on

मेघा कुचिक, कमल मिश्रा

मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक कुमार सिंह (३३) यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याप्रकरणी आरोपी ओमकार एकनाथ शिंदे (२७) याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी अटकेला दुजोरा दिला. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी, बोरिवली यांनी आरोपीला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपेकर म्हणाले, 'हत्येनंतर २४ तासांत आम्ही संशयिताला अटक केली आहे. गर्दीच्या लोकलमधून उतरताना वाद झाला. घटनेच्या वेळी आरोपी नशेत नव्हता. आरोपी ओमकार शिंदे हा मालाड पूर्वेला राहतो. तो खेतवाडी येथे मजुरीवर मेटल पॉलिशर म्हणून काम करतो. त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदार सुधीर कुमार त्रिवेदी (४१) हे नालासोपारा पूर्व येथील रहिवासी आहेत. विलेपार्ले पश्चिम येथील नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (एन.एम. कॉलेज) येथे प्राध्यापक आहेत. मृत आलोक कुमार सिंह हेही मालाड पूर्वचे रहिवासी असून त्याच ज्युनियर कॉलेजमध्ये गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

शनिवारी सायंकाळी काम संपल्यानंतर त्रिवेदी आणि सिंग कॉलेजबाहेरून रिक्षाने अंधेरी रेल्वे स्थानकात आले. सायंकाळी त्यांनी बोरिवली धीमी लोकल पकडली. डब्यात गर्दी होती. सुमारे ५.३० वाजता गाडी मालाड स्थानकाजवळ येत असताना सिंग यांच्या मागे उभा असलेला एक अनोळखी इसम त्यांच्याशी वाद घालू लागला. तो इसम सिंग यांना म्हणाला, 'मालाड येत आहे. मला उतरायचे आहे, त्यामुळे पुढे जायला द्या'. त्यावर सिंग म्हणाले, 'मलाही मालाडलाच उतरायचे आहे, पण पुढे महिला उभ्या आहेत दिसत नाही का?'

त्रिवेदी यांना मालाडला उतरायचे नसल्याने त्यांनी दरवाजाजवळ बाजूला होऊन सिंग यांना मार्ग दिला. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गाडी थांबताच गर्दीतून उतरताना सिंग आणि त्या अनोळखी इसमामध्ये शाब्दिक वाद सुरूच राहिला.

गाडीतून उतरताना सिंग यांनी दरवाज्याजवळील दांडा पकडला आणि त्रिवेदींकडे वळून म्हणाले, 'त्या माणसाने माझ्या पोटात मारले आहे.' हे ऐकताच त्रिवेदी यांनी त्या इसमाला केसांनी पकडले; मात्र तो पळून गेला. त्रिवेदी थोड्या अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला, पण तो खूप पुढे निघून गेल्याने ते थांबले. त्यांनी इतर प्रवाशांना संशयिताला पकडण्याचे आवाहन केले.

यानंतर त्रिवेदी सिंग यांच्याकडे परतले. इतर प्रवाशांच्या मदतीने जखमी सिंग यांना फलाटावरील बाकावर बसवले. सिंग यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला धारदार वस्तूने भोसकण्यात आले होते आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्रिवेदी आणि इतरांनी रेल्वे हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

थोड्याच वेळात रेल्वे पोलीस आणि ड्युटीवरील स्टेशन मास्टर घटनास्थळी पोहोचले. सिंग यांना कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६.१५ वाजता दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. नंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह भगवती रुग्णालयात पाठवला.

त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून बोरीवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी ओंकार शिंदे याची ओळख पटवून त्याला अटक केली.

पश्चिम रेल्वे विभागाच्या उपायुक्त पोलीस सुनीता साळुंके-ठाकरे म्हणाल्या, 'सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या मदतीने आम्ही आरोपीचा माग काढला. पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे.

मृत सिंग यांचे काका मनोज सिंग यांनी 'एफपीजे' शी बोलताना सांगितले, 'रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवली पाहिजे. प्रवाशांची तपासणी व्हायला हवी. मुंबईच्या लोकल गाड्या सामान्यतः सुरक्षित मानल्या जातात; पण या घटनेमुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे.'

तक्रारदार व सहकारी सुधीर कुमार त्रिवेदी म्हणाले, "गेल्या सहा महिन्यांपासून मी आलोकसोबत काम करत होतो. तो स्वभावाने अतिशय मैत्रीपूर्ण होता. गर्दीच्या लोकलमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होतात; या प्रकरणातही गाडीतून उतरताना वाद उफाळून आला.'

सिंग यांचे वडील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत असून, प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी ते दिल्लीमध्ये होते.

logo
marathi.freepressjournal.in