Mumbai : रेल्वे म्हणते, गाड्या 'वेळेत' धावतात; प्रवासी म्हणतात, १५ मिनिटे उशिरा

२०२५–२६ या वर्षासाठी मध्य रेल्वेने ९२% आणि पश्चिम रेल्वेने ९५ टक्के वक्तशीरपणाचा दावा केला आहे. मात्र, गर्दीच्या वेळी गाड्या नियमितपणे १० ते २० मिनिटे उशिराने धावतात, असा हजारो प्रवाशांचा दावा आहे.
Mumbai : रेल्वे म्हणते, गाड्या 'वेळेत' धावतात; प्रवासी म्हणतात, १५ मिनिटे उशिरा
Published on

मुंबई : २०२५–२६ या वर्षासाठी मध्य रेल्वेने ९२% आणि पश्चिम रेल्वेने ९५ टक्के वक्तशीरपणाचा दावा केला आहे. मात्र, गर्दीच्या वेळी गाड्या नियमितपणे १० ते २० मिनिटे उशिराने धावतात, असा हजारो प्रवाशांचा दावा आहे.

रेल्वेच्या वक्तशीरपणा मोजण्याच्या पद्धतीत मुख्य समस्या आहे. रेल्वेच्या सध्याच्या नियमांनुसार, पाच ते दहा मिनिटे उशिराने येणारी गाडीदेखील ‘वेळेवर’ असल्याचे मानले जाते. टीकाकारांच्या मते, यामुळे वक्तशीरपणाची आकडेवारी फुगवून सांगितली जाते आणि नोकरदारांना दररोज होणारा त्रास लपवला जातो.

‘एफपीजे’ने दोन्ही उपनगरीय मार्गांवर सहा महिने केलेल्या निरीक्षणातून एक विशिष्ट आकृतीबंध समोर आला आहे: एका गाडीला उशीर झाला की त्याचा परिणाम पुढच्या सर्व गाड्यांवर होतो. फलाटावर गर्दी वाढते, त्यानंतर येणाऱ्या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होते आणि जर त्यातच एखादी वातानुकूलित (एसी) लोकल असेल, तर गोंधळ अधिकच वाढतो.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. गर्दीच्या वेळी गाड्यांना उशीर होणे हा नियमच झाला आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. उशिराची माहिती देणाऱ्या घोषणांचा अभाव, पूर्वसूचना न देता घेतलेले ब्लॉक, वेगमर्यादा, सिग्नलमधील बिघाड, रुळांवरील अतिक्रमण आणि देखभालीची कामे ही गाड्या उशिरा धावण्यामागची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.

पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज सिंह यांनी पायाभूत सुविधांच्या कामांचा हवाला देत लवकरच ९८ टक्के वक्तशीरपणा गाठण्याचे आश्वासन दिले आहे. सिग्नल बिघाडामुळे होणाऱ्या विलंबाबाबत विचारले असता, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी म्हणाले की, रेल्वे मार्गाची देखभाल व आणि ‘कवच’ सुरक्षा प्रणाली बसवण्यासारखे अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत, जे अत्यावश्यक आहेत.’ स्थानिक गाड्यांच्या विलंबाबद्दल रेल्वेने खेद व्यक्त केला असून, सर्व सेवा लवकरात लवकर वेळेवर चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्य रेल्वे ९० टक्के वक्तशीरपणाला उत्तम मानते, पण प्रवासी १०० टक्के भाडे भरतात. जर गाडी उशिरा येत असेल, तर प्रवाशांनी फक्त ९० टक्के भाडे भरावे का?

जितेंद्र विशे, सरचिटणीस, उपनगरीय प्रवासी महासंघ

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या वेळेवर धावत नाहीत, हे वास्तव आहे. प्रवाशांना या विलंबाची इतकी सवय झाली आहे की आता ते त्यावर प्रतिक्रियाही देत नाहीत.

सुभाष तळेकर, अध्यक्ष, मुंबई डबेवाला संघटना

logo
marathi.freepressjournal.in