Video : धावत्या लोकलमधून थेट वैतरणा खाडीत पडला तरुण; खांबाला पकडून वाचवला जीव, मच्छीमारांच्या मदतीने थरारक सुटका

पालघर जिल्ह्यात बुधवारी रात्री एक थरारक घटना घडली. तो कामावरून घरी परतण्यासाठी लोकलने बोईसरकडे निघाला होता. गर्दीमुळे दरवाजाजवळ उभे राहणे ही उपनगरी प्रवाशांमध्ये सामान्य बाब आहे. तो देखील दरवाजाजवळ उभा होता.
Video : धावत्या लोकलमधून थेट वैतरणा खाडीत पडला तरुण; खांबाला पकडून वाचवला जीव, मच्छीमारांच्या मदतीने थरारक सुटका
Published on

मुंबईजवळील पालघर जिल्ह्यात बुधवारी रात्री एक थरारक घटना घडली. डहाणू- बोईसर स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून एक तरुण थेट वैतरणा खाडीत पडला. पण, घाबरून न जाता, भान न हरपता त्याने खाडीत सुरू असलेल्या बांधकामाच्या एका खांबाला धरून ठेवले. नंतर स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकी काय घडली घटना?

पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर डहाणूकडे जाणारी लोकल वैतरणा खाडी ओलांडत असताना ही घटना घडली. जखमी तरुणाची ओळख बोईसर येथील उद्यन वांगड अशी झाली आहे. तो कामावरून घरी परतण्यासाठी लोकलने बोईसरकडे जात होता. गर्दीमुळे दरवाजाजवळ उभे राहणे ही उपनगरी प्रवाशांमध्ये सामान्य बाब आहे. वांगड देखील दरवाजाजवळ उभा होता. लोकल वैतरणा खाडीवरील पुलावरून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट खाडीत कोसळला. अचानक झालेल्या या घटनेने सहप्रवासी हादरले.

आपत्कालीन साखळी ओढली, रेल्वे पोलिसांना कळवले

घटनेनंतर काही प्रवाशांनी तत्काळ आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबवली. मोटरमनने रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी पुलाखालील परिसरात शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान वांगड खाडीत सुरू असलेल्या बांधकामाच्या खांबाला धरल्यामुळे बचावला असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांची मदत मागितली.

स्थानिक मच्छीमारांनी तात्काळ बोट घेऊन घटनास्थळी धाव घेतली. खाडीतून मार्ग काढत त्यांनी वांगडपर्यंत पोहोचून त्याला बोटीत सुरक्षित बसवले आणि किनाऱ्यावर आणले. पडल्यामुळे जखमी झाला असला तरी तो शुद्धीवर होता. जखमी वांगड याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेमुळे धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करण्याच्या धोक्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in