

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवार, ९ नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. तिन्ही मार्गावरील ब्लॉकमुळे कामानिमित्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ वाजल्यापासून ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. त्यांच्या गंतव्य स्थानावर साधारणतः १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील, तर ठाणे येथून सकाळी ११.०३ वाजल्यापासून ते दुपारी ३.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर साधारणतः १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत सुटणाऱ्या वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत सर्व धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गांवर चालवल्या जातील. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने या गाड्या विलेपार्ले येथे थांबणार नाहीत आणि जलद मार्गांवर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर येथेही थांबणार नाहीत. ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द राहतील.