मुंबईकरांनो लक्ष द्या...आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घेतला आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे. तर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान ब्लॉकचे नियोजन केले आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री ते रविवारी (ता.१७ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. 

मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते ३.५५ पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल पुढे मुलुंड येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन येथे थांबवल्या जातील आणि पुढे धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या सीएसटीसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

विशेष लोकल चालविण्यात येणार

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला आणि कुर्ला-पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर १२ तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री ते रविवारी (ता.१७ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे धीमी आणि हार्बर मार्गिकेवरील सेवा विस्कळीत होणार आहे. तर ब्लॉक कालावधीत राम मंदिर स्थानकात गाड्या थांबणार नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यानच्या पुलाचे काम करण्यासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गांवर १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजेपासून रविवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा आणि काही मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in