
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत रविवार ३ ऑगस्ट रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजल्यापासून ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुख्य मार्गावर ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील ट्रेन माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे पलीकडे जाणाऱ्या जलद ट्रेन मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.
ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील ट्रेन मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील व १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ वाजल्यापासून दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील. तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ वाजल्यापासून दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील.
पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे, काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहतील, तर काही चर्चगेट गाड्या वांद्रे/दादर येथून शॉर्ट टर्मिनेट/रिव्हर्स केल्या जातील.