

मेघा कुचिक, अभिषेक पाठक / मुंबई :
मुंबईतील लोकलमधून रोज ७५ ते ८० लाख प्रवाशांची वाहतूक करते. या अतिप्रचंड प्रवाशांना सुरक्षा पुरवण्याचे आव्हानात्मक काम शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) या दोन्ही दलांना सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
जीआरपीकडे कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व त्यांचा तपास करणे आणि रेल्वे परिसरात प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही जबाबदारी असते. दुसरीकडे, आरपीएफकडे रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करणे, प्रवाशांना मदत करणे आणि सुरक्षा मोहिमांना पाठबळ देणे ही जबाबदारी असते.
अधिकृत आकडेवारीनुसार,
जीआरपीची मंजूर पदे ४,१८५ आहेत, परंतु सध्या केवळ ३,३८३ अधिकारी आणि कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत. ७४३ पदांसाठीची भरती प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. सध्याच्या घडीला, ताज्या भरती प्रक्रियेनंतर जीआरपीमध्ये ५९ पदे रिक्त आहेत.
जीआरपीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ७४३ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडलेले उमेदवार सध्या प्रशिक्षण घेत असून, ते पूर्ण झाल्यानंतर ते दलात सामील होतील. आरपीएफमध्ये ७,०४२ कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदांच्या तुलनेत सध्या केवळ ५,२२५ कर्मचारी सेवेत आहेत, ज्यामुळे १,८१६ पदे रिक्त आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आरपीएफची ५,१४८ मंजूर पदे आहेत, ज्यापैकी केवळ ३,८५२ पदे भरलेली असून १,२९६ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात १,८९४ मंजूर पदांपैकी केवळ १,३७४ कर्मचारी कार्यरत आहेत, तर ५२० पदे रिक्त आहेत.
मुंबई लोकल आकडेवारी
दैनिक प्रवासी संख्या: ७५ ते ८० लाख प्रवासी
मंजूर पदे : ४,१८५
सेवेतील कर्मचारीः ३,३८३
प्रशिक्षणाधीन नवीन कर्मचारी : ७४३
रिक्त पदेः ५९