

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेची वाढती प्रवासी संख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू आहेत. सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे ३ हजार २०० लोकल फेऱ्यांची संख्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३० पर्यंत ३ हजार ५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी येथे दिली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर आयोजित मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना वैष्णव यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे वरील माहिती दिली. “लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने २३८ वातानुकूलित लोकल रेकच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. या निर्मिती प्रक्रियेत मॉडर्न कोच फॅक्टरी आणि रेल कोच फॅक्टरी यांचा समन्वय राहणार आहे. नवीन वातानुकूलित लोकलची पहिली गाडी २०२७ मध्ये उपलब्ध होईल. तर २०३० पर्यंत सर्व २३८ रेकची निर्मिती आणि पुरवठा पूर्ण करण्याचे नियोजन आहे,” असे वैष्णव यांनी यावेळी सांगितले.
गणेशोत्सवादरम्यान यावर्षी ३५० विशेष गाड्या चालविण्यात येत असून गरज भासल्यास ही संख्या ३७० गाड्यांपर्यंत वाढविण्याची तयारी रेल्वे बोर्डाने केली आहे. वैष्णव यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड मार्गादरम्यान नियमित गाडी सुरू करण्याची मुंबई आणि कोकणातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी होती. सध्या मुंबई उपनगरीय सेवेसाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची कामे सुरू असून १२ डब्यांच्या फलाटांचे १५ डब्यांसाठी विस्तार, आधुनिक सिग्नलिंग व्यवस्था आणि २०२७ पासून २३८ नव्या वातानुकूलित लोकल रेक रेल्वे ताफ्यात येणार आहेत.”
मुंबई रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जोगेश्वरी येथे पाच नवीन फलाट आणि दोन पिटलाइन, दादर येथे अतिरिक्त फलाट, तर वसई रोड येथे सहा फलाट, तीन पिटलाइन आणि पाच स्टेबलिंग लाइन उभारण्यात येत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन फलाट आणि दोन पिटलाइन विकसित करण्यात येणार आहेत. याशिवाय अनेक विद्यमान फलाटांचा विस्तार करून ते १५ डब्यांच्या लोकलसाठी सक्षम केले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पांतर्गत सुमारे ४५५ किलोमीटरचे पिअर्स आणि ३६५ किलोमीटरचे व्हाया डक्ट पूर्ण झाले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे दरम्यानच्या भूमिगत मार्गामध्ये भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचा समावेश आहे. या बोगद्याच्या कामासाठी विक्रोळी आणि घणसोली येथून टनेल बोअरिंग मशीनद्वारे काम सुरू असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर विधानसभा अध्यक्ष ॲॅड. राहुल नार्वेकर, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर रितू तावडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
असे असेल एक्स्प्रेसचे वेळापत्रक
गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी-सावंतवाडी रोड दररोज रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. तर गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड ते सीएसएमटी दररोज सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता मुंबईत पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणातील रेल्वे जोडणी अधिक सक्षम होऊन कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे शिंदे म्हणाले.