तहानलेले राहू, रेल्वे प्रसाधनगृह नको रे बाबा! लोकल प्रवासी महिलांची खंत

हजारो महिला रोज लोकल प्रवास करतात. तास-दीड तासांचा प्रवास करताना मला खूप तहान लागते, पण पाणी प्यायलावर रेल्वेच्या अस्वच्छ प्रसाधनगृहात जावे लागेल या भीतीने त्या पाणीच पीत नसल्याचे धक्कादायक वास्तव...
तहानलेले राहू, रेल्वे प्रसाधनगृह नको रे बाबा! लोकल प्रवासी महिलांची खंत

कमल मिश्रा/मुंबई

हजारो महिला रोज लोकल प्रवास करतात. तास-दीड तासांचा प्रवास करताना मला खूप तहान लागते, पण पाणी प्यायलावर रेल्वेच्या अस्वच्छ प्रसाधनगृहात जावे लागेल या भीतीने त्या पाणीच पीत नसल्याचे धक्कादायक वास्तव उपनगरीय प्रवासी असोसिएशनच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी मांडले आहे.

महिला दिनानिमित्त महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला ‘नवशक्ति’ने वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

अरगडे यांच्याप्रमाणेच लोकल ट्रेन प्रवाशांसोबतच मुंबईत लाखो महिलांची अडचण समोर आली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण, अनेक दशके महिलांना साधी प्रसाधनगृहाची सुविधा देण्यास सक्षम ठरलेली नाही. कामावर जाणाऱ्या महिलांना याचा भयंकर त्रास सोसावा लागत आहे. या विषयावर ‘कोरो’ ही संघटना गेल्या १२ वर्षांपासून काम करत आहे. तरीही प्रशासन या विषयावर ढिम्मच आहे.

रोज गर्दीचा लोकलचा प्रवास करून कामावर पोहचण्याची धडपड महिलांना करावी लागते. तसेच कामावर असणारा कामाचा ताण, प्रतिकूल परिस्थिती, घरादाराचे ओझे आदी बाबी महिलांना निभवाव्या लागतात. त्यात त्यांना साधी स्वच्छ प्रसाधनगृहाची सुविधा मिळत नाही.

‘कोरो’ या संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुंबईत केवळ तीन सार्वजनिक प्रसाधनगृहे महिलांना समोर ठेवून बनवली आहेत. तसेच महिलांना प्रसाधनगृहात जाण्यासाठी मोठे शुल्क द्यावे लागते. स्वच्छता व सुरक्षितता यांचे आव्हान त्यांच्यासमोर असतेच. शहरातील प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. महिलांचा आरोग्याचा हक्क मान्य करण्यासाठी सर्वच भागधारकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहात त्यांना सन्मानाने जायला मिळायला हवे.

६०० पुरुषांना एक, तर १५०० महिलांना एक प्रसाधनगृह

महिलांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहाच्या चळवळीतील कार्यकर्त्या रोहिणी कदम म्हणाल्या की, केवळ एक तृतीयांश प्रसाधनगृहे महिलांसाठी आहेत. मुंबईत ६०० पुरुषांना एक, तर १५०० महिलांना एक प्रसाधनगृह वाट्याला येते. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या पायाभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

घाणेरडी महिला प्रसाधनगृहे

महिला प्रसाधनगृहे ही अस्वच्छ असतात. तसेच तुटलेले दरवाजे, पाण्याची कमतरता, विजेची अपुरी व्यवस्था आदी अडचणी असतात. तसेच या प्रसाधनगृहांसाठी महिलांना अधिक पैसे द्यावे लागतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in