Mumbai : छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला लाेकलमधून ढकलले; तरुणीने डावा हात गमावला, ५३ वर्षीय आरोपीला अटक

नायगाव रेल्वे स्थानकात गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या २० वर्षीय तरुणीच्या घटनेमागील वास्तव समोर आले आहे.
Mumbai : छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला लाेकलमधून ढकलले; तरुणीने डावा हात गमावला, ५३ वर्षीय आरोपीला अटक
Mumbai : छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला लाेकलमधून ढकलले; तरुणीने डावा हात गमावला, ५३ वर्षीय आरोपीला अटकPhoto -X
Published on: 

मुंबई/भाईंंदर : नायगाव रेल्वे स्थानकात गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या २० वर्षीय तरुणीच्या घटनेमागील वास्तव समोर आले आहे. लोकल प्रवासादरम्यान छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला विरोध केल्याने आरोपीने तरुणीला लाेकलमधून ढकलल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेत तरुणीचा डावा हात कोपरापासून तुटला असून, तिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी भाईंदर लोहमार्ग पोलिसांनी ५३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.०४ च्या सुमारास नायगाव रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर एक अज्ञात तरुणी गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिच्या डोक्याला दुखापत झाली होती, तर डावा हात कोपरापासून तुटून वेगळा झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानक व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक उपचारानंतर तिला वसईतील जनसेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला ही घटना रेल्वे अपघात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.

दरम्यान, उपचार सुरू असलेल्या तरुणीची ६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील कूपर रुग्णालयात लोहमार्ग पोलिसांनी सविस्तर जबानी नोंदवली. त्यावेळी तिची ओळख सोफिया अस्लम खान (२०) अशी पटली. सोफिया बोरीवलीहून नायगावला लोकलने प्रवास करत असताना सुमारे ५० वर्षांच्या एका व्यक्तीने तिच्याशी छेडछाड केली. नायगाव स्थानकात उतरल्यानंतर तिने संबंधित व्यक्तीला जाब विचारला. त्यावर संतापलेल्या आरोपीने तिला धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांमधील जागेतून थेट रेल्वे रूळांवर पडली. त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात चाकाखाली येऊन तुटला. त्यामुळे भाईंदर रेल्वे पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai : छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला लाेकलमधून ढकलले; तरुणीने डावा हात गमावला, ५३ वर्षीय आरोपीला अटक
बोरिवली-विरार लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; छेडछाडीला विरोध केला म्हणून २० वर्षीय महिलेला लोकलमधून ढकललं; डावा हात गमावला

पीडितेच्या जबानीनंतर ६ नोव्हेंबर रोजी भाईंदर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता. जीआरपी भाईंदर आणि आरपीएफ वसई रोड यांच्या संयुक्त पथकाने तपास सुरू केला. अखेर ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी जितेंद्र गिरजप्पा हिरमुखे (वय ५३) रा. नायगाव पूर्व याला अटक केली. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भाईंदर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक करीत आहेत.

आरोपी कर्करोग रुग्ण

घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याने चेहऱ्यावर रूमाल बांधला होता. त्यामुळे त्याला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर वेगवेगळे सीसीटीव्ही तपासून त्याला अटक केली, अशी माहिती भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी दिली. आरोपी हा ५३ वर्षांचा असून तो नायगाव पूर्व येथील वाकीपाडा परिसरात राहतो. आरोपीचे नाव जितेंद्र हिरमुखे असून तो कर्करोग रुग्ण आहे. त्याच्याविरोधात विनयभंग तसेच हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)