
मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईची लाईफलाईन आहे. लाखो प्रवासी, कर्मचारी या मुंबई लोकलने प्रवास करतात. पण,गेले काही दिवस मुंबई लोकल ही सातत्याने उशिरा येत असल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला. टिटवाळा स्थानकात प्रवाशांनी सकाळी ८.३० च्या सुमारास ‘रेल रोको’ आंदोलन केले. यामुळे मध्य रेल्वेवरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल या उशिराने सुरु आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय झाली.
प्रवाशांवर रेल्वे रोको करण्याची वेळ का आली?
मुंबईवरून येणारी प्रत्येक लोकल ट्रेन उशिरा येत असल्यामुळे प्रवाशांचा उद्रेक झाला. १५ मिनिट रेल्वे ट्रॅकवर प्रवाशी उतरले आणि त्यांनी राग व्यक्त केला. ८.१९ची लोकल प्रवाश्यांनी थांबवली आणि प्रवासी रेल्वे पटरीवर उतरले. त्यामुळे लोकल वेळापत्रक विस्कळीत झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांची समजूत काढल्यानंतर सकाळी ८.५१ वाजता लोकल पुढे रवाना झाली. मात्र या घटनेमुळे लोकल विलंबाने धावत आहेत. दरवेळेस सकाळी कामाच्या वेळी लोकल उशिरा येत असल्यामुळे प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.