मुंबई लोकलला ‘मेट्रो’टच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, विविध प्रकल्पांचे लोकार्पण

केंद्र सरकारने उपनगरीय रेल्वे लोकलची मेट्रोच्या धर्तीवर निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित आणि स्वच्छ अशा मेट्रोसारख्या लोकल ट्रेनची निर्मिती होणार आहे.
मुंबई लोकलला ‘मेट्रो’टच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, विविध प्रकल्पांचे लोकार्पण
(Photo-X/@ddsahyadrinews)
Published on

मुंबई : केंद्र सरकारने उपनगरीय रेल्वे लोकलची मेट्रोच्या धर्तीवर निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित आणि स्वच्छ अशा मेट्रोसारख्या लोकल ट्रेनची निर्मिती होणार आहे. २०२७ पासून २०३० पर्यंत मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन पायाभूत सुविधांचे ई-लोकार्पण, ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पातील ठाणे बाजूकडील टीबीएम अर्जुनाचा शुभारंभ आणि वांद्रे-कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रूतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपूलाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले उड्डाणपूल नामकरणाचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृह येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या सेवेत येणाऱ्या आधुनिक उपनगरीय रेल्वे गाड्यांबाबत माहिती दिली.

मुंबईत एकीकडे स्वच्छ, सुंदर आणि एसी मेट्रोचा प्रवास आहे, तर दुसरीकडे कष्टप्रद वाटत असणारा लोकलचा प्रवास आहे. यामधील तफावत लवकरच दूर होणार आहे. मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन २०२७ मध्ये येणार असून मार्च २०३० पर्यंत संपूर्ण लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

बीकेसीत वाहतूककोंडी कायमची संपवण्यासाठी २०१७-१८ मध्ये सहा जोडमार्ग निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काम सुरू होऊन सहा जोडमार्गांचे आठ झाले. आज शेवटच्या जोडमार्गाचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईचे दळणवळण गतिमान होत आहे. भारतनगर रोड ते वाकोला जंक्शन ही उन्नत मार्गिका प्रवासाचा अनुभव ठरणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, महानगर प्रदेशात रिंग रोड आणि सक्षम कनेक्टिव्हिटीचे जाळे साकारण्यासाठी एमएमआरडीए रस्ते, मेट्रो आणि भूमिगत पायाभूत सुविधांचे एकात्मिकरण करत आहे. एससीएलआर टप्पा-२ मुळे तसेच एकूण ८ पोहोचमार्गांमुळे पूर्व–पश्चिम जोडणी अधिक सक्षम झाली आहे.

मुंबईतील चार विकासकामांचे लोकार्पण

  • सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत भारत नगर रोड/मुंबई विद्यापीठ परिसर ते वाकोला जंक्शन उन्नत मार्गाचे लोकार्पण

  • मेट्रो मार्गिका-२ ब वरील चेंबूर मेट्रो स्थानक

  • ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी टीबीएम-२ ‘अर्जुना’चा शुभारंभ

  • बीकेसी कनेक्टर उड्डाणपुलाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ‘बॅ. बाबासाहेब अनंतराव भोसले’ यांचे नाव प्रदान

देशातील सर्वात लांब दुहेरी भुयारी बोगदा

देशातील सर्वात लांब आणि भूयारी बोगदा राहणार आहे. ठाणे ते बोरिवली या २३ किलोमीटर लांब मार्गाची लांबी दुहेरी भुयारी मार्गामुळे ११ किमीवर येईल. यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होणार असून अवघ्या १२ ते १५ मिनिटांमध्ये ठाणे ते बोरिवली गाठता येणार आहे. या मार्गाच्या पहिल्या बोगद्यासाठी ‘नायक’ टीबीएम यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बोगद्यासाठी ‘अर्जुना’ टीबीएम कार्यान्वित होत आहे. यामुळे दोन्ही दुहेरी भुयारी मार्गाचे काम समांतर पद्धतीने सुरू राहील.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुंबईतील पायाभूत सुविधांचे लोकार्पण आणि शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in