मुंबई : हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास काहीसा वेगवान होणार आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील टिळकनगर ते पनवेल स्थानकादररम्यान लोकलचा वेग वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकलचा वेग ताशी ८० किमीवरून ताशी ९५ किमी करण्यात आला आहे. यामुळे या प्रवासाच्या वेळेत दोन ते तीन मिनिटांची बचत होणार आहे.
सीएसएमटी ते पनवेल स्थानकादरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी मध्य रेल्वेने पायाभूत सुविधांची विविध कामे मार्गी लावली आहेत. यामध्ये रेल्वे रुळांचे मजबुतीकरण, ओव्हर हेड इक्विपमेंट देखभाल-दुरुस्ती, सिग्नलिंगची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण होताच लोकलचा वेग ताशी ९५ किमी करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा काही वेळ वाचणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनामार्फत हार्बर मार्गावर दररोज ६१४ लोकल फेऱ्या चालविण्यात येतात. सीएसएमटी ते पनवेल लोकल प्रवासासाठी १ तास २० मिनिटे लागतात. सीएसएमटी ते टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान दोन स्थानकातील अंतर खूप कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकल थांबणे आणि पुन्हा सुरू होऊन वेग पकडण्यात वेळ जातो.