मुंबई : पश्चिम रेल्वेने विरार-वैतरणा स्थानकादरम्यान असलेल्या पुलाचे स्लॅबसह स्टील गर्डर बदलण्यासाठी ब्लॉक घेतला आहे. २४ आणि २५ मे रोजी रात्री १०.५० ते पहाटे ४.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.
विरार-वैतरणा स्थानकादरम्यान असलेल्या पुलाचे काम पश्चिम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला असून या कालावधीत अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. या पुलाच्या कामाचा उपनगरीय रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम होणार नसला तरी विरार ते डहाणू दरम्यानच्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
२४ मे रोजी विरारहून रात्री ९.२० वाजता सुटणारी विरार-डहाणू रोड लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच २४ मे रोजी डहाणू रोडवरून रात्री १०.४५ वाजता सुटणारी ट्रेन क्रमांक डहाणू रोड-विरार लोकल रद्द करण्यात आली आहे.
अंशतः रद्द केलेल्या गाड्या
- नंदुरबार-बोरिवली एक्स्प्रेस बोईसर येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल आणि बोईसर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अंशत: रद्द केली जाईल.
- विरार-भरूच पॅसेंजर विरार आणि डहाणू रोड स्थानकांदरम्यान अंशत: रद्द राहील.
- संजन-विरार मेमू गाडी डहाणू रोड आणि विरार स्थानकांदरम्यान अंशत: रद्द होईल.
- विरार-संजन मेमू विरार आणि वाणगाव स्थानकांदरम्यान अंशत: रद्द राहील.
- सुरत-विरार पॅसेंजर डहाणू रोडवर रद्द होईल आणि डहाणू रोड आणि विरार स्थानकांदरम्यान अंशत: रद्द होईल.