
मुंबई : लोढा डेव्हलपर्सच्या माजी संचालकांना ८५ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली बुधवारी अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने आरोपी राजेंद्र लोढा यांना मध्य मुंबईतील वरळी येथील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
चौकशीदरम्यान राजेंद्र लोढा यांचा फसवणुकीत सहभाग असल्याचे समोर आले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
राजेंद्र लोढा यांनी पदाचा गैरफायदा घेत भूमीअधिग्रहणाच्या कामात मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. कंपनीच्या नीतिमत्ता समितीने त्यांच्या वर्तनाचा आढावा घेतल्यानंतर लोढा यांनी गेल्या महिन्यात लोढा डेव्हलपर्सच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना, लोढा डेव्हलपर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, संबंधित व्यक्तीची वरिष्ठता किंवा पद काहीही असो, कंपनी कोणत्याही गैरवर्तनाबद्दल कठोर शून्य-सहिष्णुता धोरण राखते. कंपनीने सांगितल्यानंतर, राजेंद्र लोढा यांनी १७ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेतील सर्व पदांवरून राजीनामा दिला.
‘सुसाइड बॉम्बर’ असल्याची दिली धमकी
कंपनीने जुलै २०२५ मध्ये लोढा यांच्या वैयक्तिक मालमत्तांची माहिती मागितली तेव्हा त्यांनी ती माहिती देण्यास नकार दिला आणि राजीनामा देण्याची धमकी दिली, असा आरोप आहे. नंतर लोढा यांनी त्यांच्या सहयोगी भारत नारोसना यांच्यामार्फत, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा यांना धमक्या दिल्या, असा आरोप करण्यात आला आहे. या धमक्यांमध्ये, ते स्वतःची आणि कंपनीची हानी करू शकतात, असे सांगून स्वतःची तुलना “सुसाइड बॉम्बर” शी केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.