
मुंबई : राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचे काम प्रगतिपथावर असून ३,३६७ धार्मिक स्थळावरील भोंगे हटवले आहेत. त्यात मुंबईतील १,६०८ भोंग्यांचा समावेश आहे. मुंबई भोंगेमुक्त झाली आहे. आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोंगे दिसतील तेथील पोलीस स्टेशनचा अधिकारी त्यास जबाबदार असेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे या मुद्याकडे लक्ष वेधले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. महाराष्ट्रात विविध धर्मीयांची धार्मिक स्थळे आहेत. धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर, भोंगे यांच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होऊन तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. लाऊडस्पीकर, भोंग्यामुळे लोकांना त्रास होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळावरील भोंगे हटवणे यावर काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुनगंटीवार यांनी केली.
आतापर्यंत ३,३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत. यात मुंबईतील १,६०८ भोंगे हटवले आहेत. त्यात १,१४९ मशिदी, ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारा आणि १४७ इतर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा समावेश आहे. सध्या मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही. राज्यात १,७५९ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत. यासंदर्भात एक अहवाल उच्च न्यायालयाकडे दाखल केला आहे. यावर न्यायालयाने समाधान व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोणताही धार्मिक तणाव न होऊ देता मुंबई पोलिसांनी धार्मिक स्थळावरील भोंगे हटवले. त्यामुळे पोलिसांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
सणासुदीच्या काळात तात्पुरती परवानगी!
धार्मिक स्थळावरील भोंगे हटवले ही चांगली गोष्ट आहे. परंतु सणासुदीच्या काळात लाऊडस्पीकर लावले जातात. त्यावर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सणासुदीच्या काळात संबंधितांना तात्पुरती परवानगी देण्यात येईल. मुख्यमंत्री म्हणाले की, “कायद्याने तत्काळ परवानग्या घेऊन मंडळांना भोंगे लावण्याची परवानगी देता येते. त्यासाठी डेसिबलची मर्यादा असते. यावेळी निश्चितपणे कोणालाही त्रास होणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
सकाळचा भोंगा बंद करण्याचा विचार!
या चर्चेच्या वेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले की, मुख्यमंत्रीजी तुमच्याकडून इतके चांगले काम होते. पण, त्या सकाळच्या १० च्या भोंग्याची तक्रार आहे. याचाही तुम्ही विचार करा, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला, मुख्यमंत्र्यांनी देखील त्यास हसत-खेळत उत्तर दिले. ते म्हणाले की, “त्यात अडचण हीच आहे की, आता ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आपल्याकडे कायदा आहे. पण, विचाराच्या प्रदूषणाविरोधातला कायदा आपल्याकडे व्हायचा आहे. तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू.”