Mumbai : पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा; धारावी, अंधेरी पूर्व, वांद्रे, खार पूर्व भाग प्रभावित; BMC जलवाहिनी जोडण्याचे काम करणार

मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर, के-पूर्व आणि एच-पूर्व विभागांत मोठ्या जलवाहिनी जोडणीचे काम २२ ते २६ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. त्यामुळे धारावी, अंधेरी पूर्व, वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पूर्व भागात पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकातही बदल करण्यात येणार आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर, के-पूर्व विभाग आणि एच-पूर्व विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम सोमवार, २२ डिसेंबरला सकाळी १० वाजेपासून शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे धारावी, अंधेरी पूर्व तसेच वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पूर्वमध्ये पाच दिवस कमी दाबाने पाणीपुर‌‌वठा होणार आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याच्या नेहमीच्या वेळेतही बदल करण्यात आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आला आहे. या वळवण्यात आलेल्या भागाचे छेद–जोडणी (क्रॉस –कनेक्शन) चे काम बृहन्मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची असून नियोजनबद्ध पद्धतीने व तांत्रिक निकषांचे पालन करून करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांना पाणीपुरवठ्यात कमीत कमी अडथळा येईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या विभागातील रहिवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करावा, पुढील काही दिवस पाणी उकळून, गाळून प्‍यावे तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

‘जी उत्तर’ विभाग (धारावी)

धारावी सकाळचा पाणीपुरवठा- धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर ढोरवाडा, महात्मा गांधी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते दुपारी १२.००) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा) धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा - धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.०० ते रात्री ९.००) (सोमवार, दिनांक २२ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)

‘के पूर्व’ विभाग (अंधेरी पूर्व)

कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३०) (सोमवार, २२ ते गुरुवार, २५ डिसेंबरदरम्यान दररोज दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा) कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजयनगर (सहार रस्ता) मोगरापाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.०० ते रात्री १०.००) (सोमवार, २२ डिसेंबर ते गुरुवार, २५ डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)

‘एच पूर्व’ विभाग (वांद्रे)

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मोतिलाल नगरसह (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते रात्री ११.४०) (सोमवार, २२ डिसेंबर ते गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज रात्री १०.०० ते रात्री ११.४० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा) प्रभात वसाहत, टीपीस-३, आग्रीपाडा, कलिना, सीएसटी मार्ग, हंसभुग्रा मार्ग, विद्यापीठ, सीएसटी मार्गाची दक्षिण बाजू, यशवंत नगर, सुंदरनगर, कोलिवरी गाव, तीन बंगला, शांतिलाल कंपाऊंड, पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग (सब वे) ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९.००) (मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर ते गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ दरम्यान दररोज मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा)

logo
marathi.freepressjournal.in