
मुंबई : महाकुंभ मेळ्यासाठी ऑनलाईन हेलिकॉप्टर राईड बुक करणे अनेक मुंबईकरांना महागात पडले असून ट्रान्स्फर केलेली रक्कम पवनहंस या सरकारी कंपनीऐवजी भलत्याच बँक खात्यांमध्ये जमा झाल्याने या प्रकरणी तपास करीत बिहारमधील टोळीतील तिघांना कफ परेड पोलिसांनी अटक केली तर या टोळीला बनावट सीमकार्ड पुरवणाऱ्या अंधेरीतील एका तरुणीसह तिच्या साथीदारालाही गजाआड करण्यात आले आहे.
कफ परेड येथील एका महिलेने महाकुंभ मेळ्यात हेलिकॉप्टर राईड घेण्यासाठी एका वेबसाईटवर दिलेल्या क्रमांकावरील तरुणाशी संपर्क साधला असता त्याने २६ जणांच्या ग्रुपसाठी सवलतीने साठ हजार रुपये होतील असे सांगत क्युआर कोड पाठवला होता. त्यानुसार महिलेने ट्रान्स्फर केलेली ती रक्कम पवनहंस या सरकारी कंपनीच्या खात्याऐवजी सोनामुनी देवी या महिलेच्या बँक खात्यात गेली. दुसऱ्या दिवशी त्या महिलेला ती वेबसाईट ऑनलाईन सापडेना म्हणून तिने त्या क्रमांकावर कॉल केला असता त्या तरुणाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसगत झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. अशाचप्रकारे कुलाब्यातील एका इसमासह अनेकांची फसवणूक करण्यात आली होती.
तक्रारीनुसार कफ परेड पोलिसांनी तपास सुरू केला असता फिर्यादींचे पैसे बिहारमधील बिहार शरीफ या शहरातील विविध एटीएम सेंटरमधून काढण्यात आल्याचे आढळले. त्याबाबत बिहार पोलिसांना कळवण्यात आले असता त्यांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अविनाशकुमार बिट्टू याला ताब्यात घेतले. त्याने आपणच बनावट वेबसाईट बनवल्याची कबुली देत गुन्ह्यातील रक्कम मुकेशकुमार याने दिलेल्या एटीएम कार्डद्वारे काढल्याची माहिती दिली. मुकेश आणि त्याचा साथीदार सौरभकुमार कॉलिंगचे काम करत असत. त्यांचे लोकेशन तपासले असता दोघेही दानापूर - सिकंदराबाद ट्रेनने सिकंदराबादला जात असल्याचे आढळले. ती माहिती नागपूर रेल्वे पोलिसांना देत त्यांची नागपूर स्थानकातच गठडी वळण्यात आली. त्या दोघांना अंधेरी येथील सीम कार्डविक्रेती तरुणी सृष्टी बर्नावल ही बनावट सीमकार्ड पुरवत असल्याचे उघडकीस आल्याने तिला तसेच ते बिहारमध्ये पोहचवणाऱ्या संजीतकुमार मिस्त्री यांनाही अटक करण्यात आली.
परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे सहाय्यक आयुक्त शशीकिरण काशिद, वरिष्ठ निरीक्षक संदीप विश्वासराव, निरीक्षक जयदिप गायकवाड, अमित देवकर, रुपेशकुमार भागवत, प्रविण रणदिवे यांनी तपासकामात सहभाग घेतला.
डबल बायो मेट्रिकचा धोका
या टोळीला बनावट सीमकार्ड पुरवणारी सीमविक्रेती तरुणी गैरमार्गाने ग्राहकांचे दोनदा बायोमेट्रिक घेऊन त्याआधारे एक सीमकार्ड ग्राहकाला देऊन दुसरे सीमकार्ड स्वतःकडे ठेवत असे आणि नंतर ते बिहारमधील या टोळीला पाठवत होती, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आपले दोनदा बायोमेट्रिक घेतले जात नाही ना हे सीम कार्ड ग्राहकांनी पाहण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त अभिनव देशमुख यांनी केले आहे.