रेसकोर्सवर उद्यानच साकारणार; BMC कडून १२० एकर जागेवरील भूमिगत सुविधांना ब्रेक; इनडोअर खेळ, पार्किंग आणि कॉन्फरन्स हॉलचा प्रस्ताव रद्द

महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या पार्कच्या आराखड्यात प्रस्तावित असलेल्या भूमिगत सुविधांना पालिका प्रशासनाने ब्रेक लावला आहे.
रेसकोर्सवर उद्यानच साकारणार; BMC कडून १२० एकर जागेवरील भूमिगत सुविधांना ब्रेक; इनडोअर खेळ, पार्किंग आणि कॉन्फरन्स हॉलचा प्रस्ताव रद्द
रेसकोर्सवर उद्यानच साकारणार; BMC कडून १२० एकर जागेवरील भूमिगत सुविधांना ब्रेक; इनडोअर खेळ, पार्किंग आणि कॉन्फरन्स हॉलचा प्रस्ताव रद्द
Published on: 

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या पार्कच्या आराखड्यात प्रस्तावित असलेल्या भूमिगत सुविधांना पालिका प्रशासनाने ब्रेक लावला आहे. इनडोअर खेळ, जिम, भूमिगत पार्किंग आणि कॉन्फरन्स हॉल यांसारख्या सुविधांऐवजी आता रेसकोर्सवर फक्त विस्तीर्ण हरित उद्यान साकारण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली असून, सेंट्रल पार्क उभारण्याची जबाबदारी पालिकेच्या उद्यान विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या सहकार्याने महापालिकेने रेसकोर्सच्या १२० एकर जागेवर न्यूयॉर्क आणि लंडनमधील प्रसिद्ध उद्यानांच्या धर्तीवर सेंट्रल पार्क विकसित करण्याची योजना आखली आहे. मार्च २०२४ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या सदस्यांमध्ये झालेल्या मतदानात ७६ टक्के सदस्यांनी सेंट्रल पार्क उभारण्यास संमती दिली होती.

भूमिगत सुविधांना आयुक्तांचा नकार

त्यानंतर प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारद हफीज कॉन्ट्रॅक्टर यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीच्या आराखड्यानुसार उद्यानाच्या वरच्या भागात विविध प्रजातींची झाडे, हिरवळीचे पट्टे, आसनव्यवस्था आणि अॅम्फी थिएटर उभारण्याचे नियोजन होते, तर भूमिगत भागात बॅडमिंटनसह विविध इनडोअर खेळांची सुविधा, जिम, पार्किंग आणि कॉन्फरन्स हॉलचा प्रस्ताव होता. मात्र, महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत आयुक्त अश्विनी भिडे यांनी या भूमिगत सुविधांना नकार देत संपूर्ण जागेचा वापर उद्यानासाठीच करण्याचे निर्देश दिले.

उत्खनन केल्यास पर्यावरणीय नुकसानाची भीती

रेसकोर्सवरील सेन्ट्रल पार्कमध्ये भूमिगत बांधकामे करण्याच्या प्रस्तावाला १०० हून अधिक वास्तुविशारदांनी विरोध दर्शविला होता. भूमिगत बांधकामांसाठी उत्खनन करण्याची गरज नसल्याचे त्यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले होते. मुंबईकर अनेक वर्षांपासून मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी या जागेचा वापर करतात, तर मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्यास पर्यावरणीय नुकसान होऊन पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. या आक्षेपांची दखल घेत उद्यान विभाग लवकरच बैठक घेऊन झाडांच्या प्रजाती, संख्या आणि हरितक्षेत्राच्या नियोजनाबाबत निर्णय घेणार आहे.

वास्तुविशारदांच्या विरोधाची दखल

रेसकोर्सवरील सेन्ट्रल पार्कमध्ये भूमिगत बांधकामे करण्याच्या प्रस्तावाला १०० हून अधिक वास्तुविशारदांनी विरोध दर्शविला होता. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून भूमिगत बांधकामांसाठी उत्खनन करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. ही जागा संपूर्ण मुंबईकरांची असून, अनेक वर्षांपासून नागरिक मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी तिचा वापर करतात. भूमिगत बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्यास पर्यावरणीय नुकसान होण्याबरोबरच शहरातील पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. प्रशासनाने या आक्षेपांची दखल घेतल्याचे मानले जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)