मविआच्या मोर्चासाठी स्टेजला नाकारली परवानगी; ट्रक-ट्रेलरवर उभे राहून नेते करणार संबोधन

१७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी अद्यापही परवानगी मिळाली नाही, तरीही हा मोर्चा होणार असा नेत्यांचा निर्धार
मविआच्या मोर्चासाठी स्टेजला नाकारली परवानगी; ट्रक-ट्रेलरवर उभे राहून नेते करणार संबोधन
Published on

भाजप नेते, प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने १७ तारखेला भव्य मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते. मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार असून अद्याप याला परवानगी न दिल्याने मविआच्या नेत्यांनी आता राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच, माविआला स्टेज उभारण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. अशामध्ये पोलिसांनी तात्पुरता उपाय म्हणून ट्रक आणि ट्रेलर उभे करून त्यामागे बॅनर लावून संबोधन करावे, अशी सूचना मविआच्या नेत्यांना केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा मोर्चा दक्षिण मुंबईमध्ये निघणार असून अर्ध्या दिवसासाठी तो परिसर बंद करण्यात येणार आहे. अशामध्ये जर स्टेज उभारला तर संपूर्ण दिवस त्यासाठी जाऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या सूचना मविआचे नेते मान्य करणार का? याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी, 'परवानगी दिली नाही तरीही, आम्ही मोर्चा काढणारच.' असा इशारा दिला आहे. १७ तारखेला या महामोर्च्याचा मार्ग जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा असणार आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी, "हे सर्व प्रकार बघून असे वाटते की राज्यात अघोषित आणीबाणी सुरु आहे. हा मोर्चा पक्षाचा नसून सर्व जनतेचा आहे, त्यामुळे या मोर्चाला परवानगी मिळायलाच हवी." असा पवित्रा कायम ठेवला आहे. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, "परवानगी नाही दिली तरी आम्ही मोर्चा काढणार. सरकार कोणाचीही असले तरीही सहसा पोलीस अशा मोर्चांना परवानगी देत नाहीत. परवानगी नाकारायचा की नाही हा सरकारचा प्रश्न. पण, लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा अधिकार आहे." असे म्हणत त्यांनी टीका केली.

logo
marathi.freepressjournal.in