Mumbai : पालिका सुधार समितीत महायुतीत खदखद; भाजप नगरसेवकांची पक्षनेतृत्वाकडे तक्रार

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी महायुतीमध्ये मतभेद उफाळून येत असल्याचे संकेत मिळत असून सुधार समितीच्या कामकाजावरून भाजप आणि शिवसेनेत नाराजी वाढल्याचे समोर आले आहे.
Mumbai : पालिका सुधार समितीत महायुतीत खदखद; भाजप नगरसेवकांची पक्षनेतृत्वाकडे तक्रार
Mumbai : पालिका सुधार समितीत महायुतीत खदखद; भाजप नगरसेवकांची पक्षनेतृत्वाकडे तक्रार(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेतील सत्ताधारी महायुतीमध्ये मतभेद उफाळून येत असल्याचे संकेत मिळत असून सुधार समितीच्या कामकाजावरून भाजप आणि शिवसेनेत नाराजी वाढल्याचे समोर आले आहे. सुधार समितीच्या अध्यक्षा तथा शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांच्या कार्यपद्धतीबाबत भाजपच्या नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष आमदार अमित साटम यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या आठवड्यात सुधार समितीतील भाजप सदस्य नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने साटम यांची भेट घेतली. समितीतील अनेक प्रस्तावांवर चर्चा किंवा मतदानाची संधी न देता ते मंजूर केले जात असल्याची तक्रार त्यांनी केली. वडाळ्यातील दोन भूखंड एकत्र करून विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या (डीसीपीआर) कलम ३३(७) अंतर्गत पुनर्विकासाला मंजुरी देण्याच्या प्रस्तावाचे उदाहरणही यावेळी देण्यात आले.

भाजप सदस्यांमध्ये नाराजी

सुधार समितीत भाजपचे नऊ तर शिवसेनेचे केवळ तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे कोणताही प्रस्ताव मतदानासाठी आला तर भाजपचे बहुमत निर्णायक ठरू शकते, असा भाजप सदस्यांचा दावा आहे. मात्र, मतदानच घेतले जात नसल्याने सदस्यांच्या मताला महत्त्व दिले जात नसल्याची भावना भाजप नगरसेवकांमध्ये आहे.

नगरसेविकेच्या पतीचा हस्तक्षेप

भाजपने शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांच्याकडेही नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. सुधार समितीच्या बैठकीत संध्या दोशी यांच्या पतींचा हस्तक्षेप होत असल्याचाही आरोप काही भाजप नेत्यांनी केला आहे. बैठकीपूर्वी होणाऱ्या अनौपचारिक बैठकीत ते उपस्थित राहून मत व्यक्त करतात, अशी माहिती भाजप नेत्यांनी दिली. मात्र शिवसेना नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in