

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा पाऊस गेल्यानंतरही धोका कायम आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून यंदा ऑक्टोबरपर्यंत १२ हजार ५७४ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चार हजार ५३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे मलेरियामुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टापुढे मुंबईतील वाढते रुग्ण हे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मात्र ८४ टक्क्यांची घट झाली आहे.
राज्य सरकारने २०३० पर्यंत महाराष्ट्र मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांना दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये मुंबईत हिवतापाचे तीन हजार ९८५ रुग्ण आढळले होते. २०२३ मध्ये ही संख्या सात हजार ३१९ वर पोहोचली. २०२४ मध्ये सात हजार ९३९, तर २०२५ मध्ये १० हजार १६३ रुग्णांची नोंद झाली. यंदा ऑक्टोबरपर्यंतच रुग्णसंख्येने १२ हजार ५७४ चा टप्पा ओलांडला आहे. पाच वर्षांतील या आकडेवारीवरून हिवतापाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये ऑक्टोबरपर्यंत हिवतापाचे आठ हजार ५२१ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत यंदा याच कालावधीत चार हजार ५३ रुग्णांची वाढ झाली आहे. म्हणजेच वर्षभरात रुग्णसंख्येत जवळपास दीडपट वाढ झाली आहे.
चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट
ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुंबईत मलेरियाचे १२ हजार ५७४ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ८ हजार ५२१ होती. म्हणजेच यंदा ४ हजार ५३ रुग्णांची वाढ झाली आहे. याउलट, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या ७१० वरून यंदा ११३ वर आली आहे. त्यामुळे ५९७ रुग्णांची घट नोंदविण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या यापूर्वीच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १४ जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत मलेरियाचे ३ हजार ६८१ रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत ३ हजार ११५ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात १८.२ टक्क्यांची वाढ झाली होती. जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ७ हजार ४२२ रुग्णांची नोंद झाली, तर २०२५ मध्ये याच कालावधीत ५ हजार १४४ रुग्ण आढळले होते. म्हणजेच ४४ टक्क्यांची वाढ झाली.
सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय, भाभा रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालयासह उपनगरांतील अनेक महापालिका रुग्णालयांमध्ये चिकुनगुनियाच्या निदानासाठी आवश्यक असलेली एलिसा चाचणी सुविधा उपलब्ध नाही. अलीकडेच मिळालेल्या आरटीआय उत्तरानुसार, अनेक रुग्णालयांमध्ये रॅपिड टेस्ट किट्सही उपलब्ध नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पुरेशा चाचणी सुविधाच उपलब्ध नसताना चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येतील घटीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल कोठारी यांनी उपस्थित केला आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णसंख्येतील वाढीचे कारण अनेकदा सुधारित चाचणी व्यवस्था आणि रोगनिगराणीला दिले जाते. मात्र, रुग्णसंख्येतील घट ही प्रत्यक्षात रोगनियंत्रणामुळे झाली आहे की अपुऱ्या निदान सुविधांमुळे रुग्णांची नोंद कमी झाली आहे, याचीही तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपाययोजना तीव्र
मुंबई महापालिकेने डास नियंत्रण आणि रोगनिगराणीच्या उपाययोजना तीव्र केल्याचे स्पष्ट केले आहे. ताप सर्वेक्षण, रक्ताचे नमुने गोळा करणे, डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची तपासणी, धूरफवारणी आणि कीटकनाशकांची फवारणी अशा विविध उपाययोजना शहरभर राबविण्यात येत आहेत. महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १५ सप्टेंबर या कालावधीत महापालिकेच्या पथकांनी ५ लाख ९४ हजार २६९ घरांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाद्वारे २७ लाख ९३ हजार १९३ नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर ३२ हजार ११४ रक्तनमुने गोळा करण्यात आले. मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या २१ हजार ६५५ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ३६७ ठिकाणी अनोफिलीस डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले.
हिवतापाचे वर्षनिहाय रुग्ण
वर्ष - रुग्ण
२०२२ - ३,९८५
२०२३ - ७,३१९
२०२४ - ७,९३९
२०२५ - १०,१६३
२०२६ - १२,५७४
(ऑक्टोबरपर्यंत)
(स्रोत : मुंबई महापालिका)
आलेख चढाच : १५ सप्टेंबरपर्यंत मलेरियाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ७२३ वर पोहोचली होती. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत ६ हजार २७७ रुग्णांची नोंद झाली होती. ही वाढ ३९ टक्के होती. ऑक्टोबरमधील ताज्या आकडेवारीवरून मलेरियाचा वाढता आलेख कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत झालेल्या मोठ्या घटीमुळे प्रत्यक्षात संसर्ग कमी झाला आहे की, पुरेशा निदान सुविधांअभावी रुग्णांची नोंद होत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये चिकुनगुनियाच्या निदानासाठी आवश्यक चाचणी सुविधांचा अभाव असल्याचा दावा करण्यात येत आहे.