
मुंबई : मुंबईत मलेरियाच्या रुग्णांत मोठी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावरच मुंबईत ६,००० हून अधिक मलेरियाची प्रकरणे नोंदवण्यात आली असून, हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत २१%ने जास्त आहे.
मान्सून लवकर सुरू झाल्याने आणि अतिवृष्टीमुळे ही वाढ झाल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र, कमजोर तपासणी व देखरेख व्यवस्थाही मलेरियाच्या वाढीला कारणीभूत ठरत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या त्रुटींचा उलगडा अलीकडील वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान झाला. यावेळी अधिकाऱ्यांनी उघड केले की, पालिकेला सातत्याने वार्षिक रक्त तपासणी दर (ABER) च्या राष्ट्रीय निकषांमध्ये अपयश पत्करावे लागले आहे. ABER हा मलेरियाच्या नियंत्रणासाठी एक महत्त्वाचा निर्देशक आहे.
ABER म्हणजे वार्षिक रक्त तपासणी दर, जो तपासलेल्या रक्त स्लाइड्सच्या संख्येला वर्षाच्या मध्यावधी लोकसंख्येने भाग देऊन आणि १०० ने गुणून मोजला जातो.
जास्त ABER म्हणजे सक्रिय मलेरिया तपासणी, तर कमी ABER म्हणजे तपासणी आणि देखरेख अपुरी आहे, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनुसार ABER किमान १२% असणे आवश्यक आहे. मात्र, मुंबईत ABER वारंवार या पातळीखालीच राहिला आहे. याचे एक कारण म्हणजे, पालिकेचे रक्त सलाईड तपासणी (gold-standard) ऐवजी Rapid Diagnostic Kits (RDKs) वर अधिक अवलंबून राहणे.
२०१५ ते २०२४ या कालावधीतील आकडेवारीनुसार, मुंबईत ABER बहुतेक वेळा १२% पेक्षा कमी राहिला आहे.
भारत सरकारने २०३० पर्यंत मलेरिया निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टासाठी WHO ची सलग तीन वर्षांची प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.
यासाठी, मुंबईत २०२७ पर्यंत मलेरियाचा समूळ नष्ट होणे आवश्यक आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ABER राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा अधिक आहे. २०२४ मध्ये ABER १२ टक्के, तर २०२५ मध्ये आत्तापर्यंत १३.९ टक्के आहे, जे शिफारस केलेल्या निकषांपेक्षा वरच आहे. काही वेळा डेटा संकलनात तांत्रिक अडचणींमुळे ABER १२ टक्क्यांखाली दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात आम्ही नियमितपणे मलेरियाची तपासणी करतच आहोत. पालिका जागतिक आरोग्य संघटनेच्या '१-३-७' मार्गदर्शक तत्वांचे पालन करते. मलेरियाचे एक प्रकरण आढळल्यास, आम्ही त्या भागातील किमान २०० घरे सर्वेक्षण करतो आणि तातडीने प्रतिबंधक उपाययोजना राबवतो. त्यामुळेच, सध्या मलेरियाच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसत असली तरी, ती सक्रिय तपासणी आणि देखरेखीमुळे आहे.
डॉ. दक्षा शाह, आरोग्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगरपालिका
२०१५ ते २०१९ दरम्यान तपासणीचे प्रमाण साधारण ११–१२% दरम्यान होते. मात्र कोविड-१९ महामारीच्या वर्षी, २०२० मध्ये, या दरात मोठी घट झाली आणि फक्त ६.८% लोकांची तपासणी झाली. २०२१ पासून हळूहळू वाढ दिसून आली, २०२४ मध्ये हा दर ११.७% पर्यंत पोहचला.