मलेरिया, डेंग्यूच्या डासांचा शोध सुरू; बांधकाम ठिकाणे, झोपडपट्टी परिसराची झाडाझडती; अतिरिक्त आयुक्तांची माहिती

पावसाळ्याच्या तोंडावर मलेरिया डेंग्यू, लेप्टोसारख्या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने कंबर कसली आहे. मलेरिया व डेंग्यूच्या प्रादुर्भावाला कारणीभूत डासांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून बांधकाम ठिकाणे आणि झोपडपट्टी परिसराची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.
मलेरिया, डेंग्यूच्या डासांचा शोध सुरू; बांधकाम ठिकाणे, झोपडपट्टी परिसराची झाडाझडती; अतिरिक्त आयुक्तांची माहिती
मलेरिया, डेंग्यूच्या डासांचा शोध सुरू; बांधकाम ठिकाणे, झोपडपट्टी परिसराची झाडाझडती; अतिरिक्त आयुक्तांची माहिती प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मलेरिया डेंग्यू, लेप्टोसारख्या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने कंबर कसली आहे. मलेरिया व डेंग्यूच्या प्रादुर्भावाला कारणीभूत डासांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून बांधकाम ठिकाणे आणि झोपडपट्टी परिसराची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.

पुढील दीड-दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी नालेसफाईच्या कामाला वेग दिला आहे. सिमेंट क्रॉक्रिटच्या कामाला गती दिली असून ३१ मे पर्यंत नालेसफाईचे काम व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी कीटकनाशक विभागाने अडगळीच्या ठिकाणांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यापासूनच ही मोहीम हाती घेतली आहे.

ज्या ठिकाणी एडिस डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध लागेल त्यांनी स्वच्छता राखावी, पाणी साठवून ठेवू नये, अशा सूचना मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहेत. बांधकाम ठिकाण, झोपडपट्टी परिसर, गॅरेज इत्यादी ठिकाणी शोधमोहीम हाती घेतल्याचे विपीन शर्मा यांनी सांगितले.

नियम पाळले नाहीत तर ‘स्टॉप वर्क’ नोटीस

बांधकाम ठिकाणी नियमित तपासणी केली जात असून संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांना डास नियंत्रणासाठी प्रशिक्षण दिले जाते. पावसाळ्यापूर्वी विशेष मोहीम राबवून कामगारांची तपासणी केली जाते. मोठ्या साइट्सवर साचलेले पाणी आणि टाकाऊ साहित्य हे डास वाढीस कारणीभूत ठरत असून ते हटवणे ही साइट व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

मनुष्यबळाची कमतरता

मुंबईत दोन हजारांहून अधिक बांधकाम प्रकल्प सुरूआहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये सरासरी ८० ते १०० बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. मात्र, कीटकनाशक विभागात ४०० ते ५०० पदे रिक्त असल्याने असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे या विभागातील मनुष्यबळाची कमतरता तातडीने भरून काढा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in