मुंबईतील मराठी शाळांतील विद्यार्थ्यांचा टक्का घसरला; १० वर्षांत १ लाख विद्यार्थी घटले

मुंबई महापालिका शाळांचा दर्जा उंचावत असल्याचा दावा पालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात शिक्षण विभाग फोल ठरल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या १० वर्षांत मराठी शाळांतील तब्बल १ लाख विद्यार्थी घटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई महापालिका शाळांचा दर्जा उंचावत असल्याचा दावा पालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात शिक्षण विभाग फोल ठरल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या १० वर्षांत मराठी शाळांतील तब्बल १ लाख विद्यार्थी घटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलगू, कन्नड आणि गुजराती अशा आठ प्रकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मुंबई पालिकेच्या शाळांचा दर्जा टिकवण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी गरीब व गरजू घरातील असतात. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. शिशुवर्गासह पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट, मोजे यांसह कंपास पेटी, प्लास्टिक पट्टी, कलर्स, ड्रॉइंग पेन्सिल, ब्रश, रायटिंग पेन्सिल, खोडरबर, प्लास्टिक बॉक्स, बॉलपेन बॉक्स, दप्तर, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, वह्यांचा संच, रेनकोट, छत्री इत्यादी २७ वस्तू दिल्या जातात. बेस्ट मोफत प्रवास, व्हर्चुअल क्लास अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. पालिका शाळेत येणारे विद्यार्थी गरीब व गरजू घरातील असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे मोफत शिक्षण देण्यासह शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते. तरीही इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढला असून मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.

अविनाश ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

इंग्रजी शाळांकडे कल

गेल्या काही वर्षांत पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढला आहे. इंग्रजी भाषेला पसंती लक्षात घेता मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळांना पालकांची पसंती मिळत आहे. तरीही विद्यार्थ्यांची गळती सुरू असून गळती रोखण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.

logo
marathi.freepressjournal.in