

मुंबई : दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर दिसतील अशा स्वरुपात मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र, आजही अनेक दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याने दुसऱ्या टप्प्यात २९४ दुकाने व आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्याचे विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी सांगितले. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना रडारवर असून मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनाला आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा कारकर यांनी दिला आहे.
मुंबईतील दुकाने व आस्थापनांना दिसतील अशा प्रकारे मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात मुंबईतील ३६ हजार ७७३ आस्थापनांची झाडाझडती घेतली. यात १,१२४ आस्थापनांचा अहवाल तयार केला असता १,१२४ अस्थापनांना न्यायालयात खेचण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मराठी नामफलक न लावणाऱ्या ६३८ दुकानांवर आणि आस्थापनांवर महापालिकेने न्यायालयात दावे दाखल केले असून त्यापैकी १४३ आस्थापनांवरील न्यायालयीन खटल्यांची कारवाई अंतिम टप्प्यात आहे तर काही प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यासाठी आलेल्या अर्जापैकी १९० आस्थापनांच्या मालकांकडून १२ लाख २३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मराठी नामफलकांसाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी व मुंबई महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांच्या पुढाकाराने पहिल्या टप्प्यात मे महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.
कारवाईचा बडगा उगारणे सुरू
दुसऱ्या टप्प्यात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान एस. व्ही. रोड व एलजीएस रोडवरील तब्बल ९,७९८ दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली. यात २९४ दुकाने व आस्थापनांनी प्रवेशद्वारावर दिसतील अशा स्वरूपात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दुकाने व आस्थापना विभागाच्या निदर्शनाला आले आहे. त्यामुळे २९४ दुकाने व आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्याचे दीक्षा कारकर यांनी सांगितले.