

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई
दिवसागणिक वाढणारी थंडी, वर्षभराची प्रतीक्षा आणि धावण्याच्या मार्गात झालेला बदल यांसारख्या विविध आव्हानांना तमाम धावपटू समर्थपणे सामोरे गेल्याने रविवारी टाटा मुंबई मॅरेथॉनचे २१वे पर्व धडाक्यात पार पडले. विक्रमी ६९ हजारांहून अधिक स्पर्धकांच्या साक्षीने झालेल्या यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये एलिट गटात विदेशी खेळाडूंचेच वर्चस्व पाहायला मिळाले. मात्र भारतीयांच्या विभागात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विजयी झेंडा फडकावला. भारताच्या लांब पल्ल्यांच्या धावपटूंसाठी ही स्पर्धा एका नव्या युगाची सुरुवात ठरली.
२००४पासून जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबई मॅरेथॉनचा थरार रंगतो. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक धावपटू यामध्ये सहभागी होतात. या मॅरेथॉनमध्ये कोरोनामुळे दोन वर्षे (२०२१, २०२२) खंड पडला होता. मात्र २०२३पासून मुंबईकरांनी पुन्हा एकदा धाव घेतली. पूर्ण मॅरेथॉन (४२ किमी), अर्ध मॅरेथॉन (२१ किमी), हौशींसाठी ५ ते १० किमी मॅरेथॉन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मॅरेथॉन व सेलिब्रिटी रन असे विविध गट यंदाही स्पर्धेत होते. आयोजकांनी घेतलेली अफाट मेहनत व मुंबई पोलिसांच्या सहकार्यामुळे यंदादेखील ही स्पर्धा सुरळीतपणे संपन्न झाली. भारतीयांमध्ये मुंबईचा कार्तिक करकेरा आणि नाशिकची संजीवनी जाधव यांनी ऐतिहासिक जेतेपद मिळवले. मुख्य म्हणजे दोघेही नाशिकला एकाच अकादमीत सराव करतात.
स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एलिट गटात इथिओपियाच्या ताडू अबाटे डेमे याने विजेतेपद पटकावले. त्याने ४२ किमीचे अंतर २ तास ९ मिनिटे ५५ सेकंद या वेळेत पूर्ण केले. २०२३मध्ये इथिओपियाच्याच हायले लेमीने २ तास ७ मिनिटे ३२ सेकंद वेळ नोंदवली होती. मात्र अबाटे फक्त २ मिनिटांनी त्याचा विक्रम मोडण्यापासून दूर राहिला. एलिट गटात केनियाच्या लिओनार्ड लँगटला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने २ तास १० मिनिटे १० सेकंद या वेळेत दुसरे स्थान मिळवले. एरिट्रियाच्या मेरहवी केसेटने २ तास १० मिनिटे २२ सेकंद या वेळेसह तिसरा क्रमांक मिळवला.
अबाटे आणि लँगट या दोघांनीही ४० किमीच्या अंतरापर्यंत सोबत चालणे पसंत केले. केसेटे त्यांच्यापासून सुमारे ५० मीटर मागे होता. अबाटेने शेवटच्या किलोमीटरमध्ये आपला वेग वाढवला. दुसरीकडे, लँगटला बरोबरी साधण्यासाठी संघर्ष करावा लागला. लँगट हा १५ सेकंदांच्या फरकाने दुसऱ्या स्थानावर राहिला. केसेटेने तिसरे स्थान मिळवले. यंदाचे जेतेपद हे इथिओपियन धावपटूंचे मुंबईतील पुरुष आणि महिला दोन्ही गटांत मिळून सातवे विजेतेपद आहे.
महिलांच्या एलिट गटात इथिओपियाच्याच येशी कलायू चेकोले हिने विजेतेपद काबिज करताना २ तास २५ मिनिटे १३ सेकंद या वेळेत ४२ किमी अंतर पार केले. २०१९पासून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या येशीने प्रथमच ही स्पर्धा जिंकली. किडसन अलीमाने २ तास २७ मिनिटे ३५ सेकंद या वेळेसह दुसरे, तर गोजम सेगायेने २ तास २८ मिनिटे २७ सेकंद या वेळेसह तिसरे स्थान पटकावले. एलिट गटांतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०, २५ व १५ हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले.
भारतीय धावपटूंमध्ये मग मूळच्या बोरिवलीच्या मात्र सध्या नाशिकमध्ये स्थायिक असलेल्या २८ वर्षीय कार्तिकने अग्रस्थान पटकावले. त्याने २ तास १९ मिनिटे ५५ सेकंद इतकी वेळ नोंदवली. विशेष म्हणजे तो एकंदर स्पर्धेतील पुरुष गटात १०व्या स्थानी राहिला. गतविजेत्या अनिष थापाने २ तास २० मिनिटे ८ सेकंद या वेळेसह यंदा भारतीयांमध्ये दुसरे स्थान प्राप्त केले. प्रदीप चौधरी २ तास २० मिनिटे ४९ सेकंद या वेळेसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
महिलांच्या विभागात नाशिकच्या संजीवनीने भारतीयांमध्ये अग्रस्थान मिळवताना २ तास ४९ मिनिटे २ सेकंद अशी वेळ नोंदवली. यंदा प्रथमच पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावताना तिने जेतेपद काबिज केले. एलिट गटात ती एकंदर १०व्या स्थानी राहिली. त्यानंतर निर्माबेन ठाकोरची जेतेपदाची हॅटट्रिक यावेळी हुकली. तिने सलग दोन वेळा भारतीय महिलांच्या विभागात विजेतेपद मिळवले होते. मात्र यंदा तिला २ तास ४९ मिनिटे १३ सेकंद म्हणजेच अवघ्या ११ सेकंदांच्या फरकाने दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. सोनमने (२ तास ४९ मिनिटे २४ सेकंद) तिसरा क्रमांक मिळवला. भारतीय एलिट पुरुष आणि महिला गटातील पहिल्या तीन विजेत्या खेळाडूंना अनुक्रमे ५, ४ आणि ३ लाख रुपये देऊन गौरवण्यात आले.
पहाटे ५.३०च्या सुमारास सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सत्तरी ओलांडलेल्या नागरिकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. डीजे, ढोलताशांच्या तालावर जल्लोष, सेल्फी पॉइंट असेही चित्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते आझाद मैदान या परिसरात पाहायला मिळाले. असंख्य आठवणींसह अशाप्रकारे टाटा मुंबई मॅरेथॉनचे आणखी एक पर्व उत्साहात संपन्न झाले आणि शर्यत पूर्ण केलेल्या धावपटूंनी पदकासह आपापले घर गाठले.
विविध गटांतील विजेत्यांची यादी
एलिट गट (पुरुष)
ताडू अबाटे डेमे (२ तास ०९.५५ मिनिटे)
लिओनार्ड लँगट (२ तास १०.१० मिनिटे)
मेरहवी केसेट (२ तास १०.२२ मिनिटे)
एलिट गट (महिला)
येशी कलायू चेकोले (२ तास २५.१३ मिनिटे)
किडसन अलीमा (२ तास २७.३५ मिनिटे)
गोजम सेगाये (२ तास २८.२७ मिनिटे)
भारतीय पुरुष गट
कार्तिक करकेरा (२ तास १९.५५ मिनिटे)
अनिष थापा (२ तास २०.०८ मिनिटे)
प्रदीप चौधरी (२ तास २०.४९ मिनिटे)
भारतीय महिला गट
संजीवनी जाधव (२ तास ४९.०२ मिनिटे)
निर्माबेन ठाकोर (२ तास ४९.१३ मिनिटे)
सोनम (२ तास ४९.२४ मिनिटे)