

मुंबई : अंधेरी पूर्वेत मरोळ नाका परिसरात बांधकामग्रस्त इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मरोळ नाका मेट्रो स्टेशनखाली प्रिविलोन या विकासकाकडून सुरू असलेल्या बांधकाम इमारतीजवळ ही दुर्घटना घडली. सध्या येथे निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू आहे. याच बांधकाम इमारतीच्या सातवा मजल्यावरुन लोखंडी रॉड खाली पडल्याने अमर आनंद पगारे (३०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
नाशिकवरुन बुधवारी सकाळी अमर पगारे हे मुंबईत आले. सकाळी ११ वाजता येथील मरोळ नाका परिसरात ते आले असता ही दुर्घटना घडली. मरोळ नाका परिसरात ‘प्रेविलोन’ या विकासकाकडून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लोखंडी रॉड कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.