'मातोश्री'वर ड्रोनच्या घिरट्या; 'पॉडटॅक्सी' प्रकल्पासाठी सर्वेक्षण - MMRDA चे स्पष्टीकरण
मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे कलानगर येथील ‘मातोश्री’ निवासस्थान परिसरात ड्रोन घिरट्या घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. ड्रोनच्या माध्यमातून ‘मातोश्री’वर कोण नजर ठेवतय, असा सवाल शिवसेना नेत्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ‘एमएमआरडीए’कडून सर्वेक्षण सुरू असून त्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याचा दावा खेरवाडी पोलिसांनी केला आहे.
‘मातोश्री’ हे वांद्रे येथील ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असून ते नेहमीच उच्च सुरक्षा व्यवस्थेखाली असते. त्यामुळे ड्रोनच्या घिरट्यांमुळे ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा दावा शिवसेना (उबाठा) गटाकडून करण्यात आला.
‘मातोश्री’ निवासस्थान परिसरात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे रविवारी सकाळी उघड झाले. त्यानंतर ड्रोनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. ड्रोनच्या माध्यमातून ‘मातोश्री’ निवासस्थानावर कोण टेहळणी करतय का? कोण तरी पाळत ठेवून आहे, अशा चर्चा ‘मातोश्री’ परिसरात सुरू झाल्या. ‘मातोश्री’ परिसरात ड्रोन उडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मातोश्रीवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला.
‘एमएमआरडीए’कडून सर्वेक्षण सुरू असल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण
‘मातोश्री’वर ड्रोनने नजर ठेवली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि खेरवाडी येथे ड्रोन उडवले जात आहेत. ‘एमएमआरडीए’कडून या भागात सर्वेक्षण केले जात आहे, त्यासाठी हे ड्रोन उडवले जात असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले. पोलिसांच्या परवानगीने ड्रोन उडवले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ८ ते १६ नोव्हेंबरपर्यंत ‘एमएमआरडीए’कडून सर्वेक्षण होणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
आदित्य ठाकरे संतप्त
बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. कोणता सर्व्हे एखाद्याच्या घरात डोकावण्याची आणि दिसताच लगेच पळून जाण्याची परवानगी देतो? यासाठी स्थानिक रहिवाशांना माहिती का देण्यात आली नाही? असे सवाल करीत त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
‘पॉडटॅक्सी’ प्रकल्पासाठी सर्वेक्षण - एमएमआरडीए
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात ‘पॉडटॅक्सी’ सेवा प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत असून त्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली आहे, असे ‘एमएमआरडीए’ने स्पष्ट केले.
