

मुंबई : धरणातील पाणीसाठ्यात घट होत असून वरुणराजाचे आगमन नेमके कधी होईल याची शाश्वती उरलेली नाही. त्यामुळे २० जूननंतर धरणातील पाण्याचा आढावा घेत पाणीकपातीत वाढ करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. तसेच बांधकाम ठिकाणी, स्विमिंग पूल, क्लब याठिकाणी पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यांवर वाहने धुणाऱ्यांवर ॲक्शन घेण्यात येणार आहे.
वरुणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने यंदा मुंबईत पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे बाष्पीभवन होत असल्याने धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, दिवसेंदिवस धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने पाणीकपातीत वाढ करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. २० जूननंतर पाणीसाठ्याचा आढावा घेत पाणीकपातीत आणखी वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असून निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
सातही धरणात फक्त १०.७२ टक्के पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत १५ जून रोजी फक्त १०.७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील पाणीसाठा व राज्य सरकारने उपलब्ध करुन दिलेला राखीव साठा जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे. मात्र, पुढील काही दिवसांत पाऊस पडलाच नाही तर आणखी परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. परंतु यंदा १५ जून रोजी सातही धरणात १ लाख ५५ हजार १६७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. तर राज्य सरकारकडून २ लाख ३० हजार ५०० दशलक्ष लिटर राखीव साठा उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा व राज्य सरकारने उपलब्ध केलेला राखीव पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका आहे.
सातही धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी
अप्पर वैतरणा - ० टक्के
मोडक सागर - ३०.८९ टक्के
तानसा - ५.५३ टक्के
मध्य वैतरणा - ११.२० टक्के
भातसा - १०.०१ टक्के
विहार - ४२.६९ टक्के
तुळशी - २३.६० टक्के
१५ जूनला सातही धरणातील
पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा - ०
मोडक सागर - ३९,८२३
तानसा - ८,०२९
मध्य वैतरणा - २१,६७४
भातसा - ७१,९१७
विहार - ११,८२५
तुळशी - १,८९९
बांधकाम, स्विमिंग पूल, क्लबमधील पाणी वापरावर निर्बध येणार
बांधकाम स्थळी, स्विमिंग पूल, क्लब आदी ठिकाणी पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला असून मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.