मुंबईचा महापौर भाजपचाच, नाहीतर विरोधी पक्षात बसू! सुधीर मुनगंटीवार यांचा शिंदेसेनेला थेट इशारा

मुंबई महापालिकेत महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा यावर सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच महायुतीचा महापौर होईल, असे मोघम उत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिले जात आहे. मात्र, आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'महापौर भाजपचाच होईल, नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू', असा स्पष्ट इशारा शिंदेसेनेला दिला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेत महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा यावर सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच महायुतीचा महापौर होईल, असे मोघम उत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिले जात आहे. मात्र, आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'महापौर भाजपचाच होईल, नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू', असा स्पष्ट इशारा शिंदेसेनेला दिला आहे.

मुंबईच्या महापौरपदावर भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांनीही दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील अंतर्गत चर्चा आणि वाद मिटल्याशिवाय एकत्रित गटनोंदणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवड प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महापौरपदाबाबत शिंदे गटाला थेट इशाराच दिला आहे. 'उबाठा'चा महापौर करण्याचा प्रश्नच येत नाही, महापौर होईल तर भाजपचाच होईल, नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी महापौरपदाबाबत आपली भूमिका मांडली. तसेच, दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यात भाजपच्या नगरसेवकांना कुठलीच रुची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गटनोंदणी न झाल्याने महापौर निवड लांबणीवर ?

भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महापौर निवडणूक ३१ जानेवारी किंवा २ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेना हे एकत्रित गट स्थापन करणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

logo
marathi.freepressjournal.in