

मुंबई : राणी बागेतील महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावरून महापौर रितू तावडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. महापौर बंगला आणि परिसरातील नुतनीकरणावर २ कोटी ८९ लाख रुपये खर्चाची निविदा मागवण्यात आली. अवघ्या सहा महिन्यात तिसरे टेंडर काढल्यामुळे महापौरांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी टीकेची चौफेर झोड उठवली आहे. अखेर हे टेंडर रद्द करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेल्या भाजपचा घटकपक्ष शिवसेना शिंदेसेनेचे पालिकेतील गटनेते अमय घोले यांनी मुंबईकरांच्या पैशांची उधळण थांबवा, गरज नसताना खर्च कशाला, अशा शब्दांत अमेय घोले यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
दरम्यान, स्वतःच्या बंगला गाडीवर खर्च म्हणजे वायफळ खर्च, अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी भाजपवर टीका केली. दरम्यान, महापौरांकडून वारंवार असे प्रकार घडत असल्याने मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीही नाराजी व्यक्त केली. तसेच निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची सूचना त्यांनी केली.
मुंबई महापालिकेकडून महापौरांच्या अधिकृत बंगल्याच्या परिसरातील उन्नतीकरण (अपग्रेडेशन) कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदेवरून बुधवारी मोठा राजकीय वाद निर्माण झाला. वाद तीव्र होताच महापौर रितू तावडे यांनी या संपूर्ण प्रकरणापासून स्वतःला अलिप्त ठेवत संबंधित निविदा तातडीने रद्द करण्याचे निर्देश दिले. “अधिकृत बंगल्याच्या नूतनीकरणासाठी किंवा उन्नतीकरणासाठी त्यांनी कोणतीही मागणी केलेली नाही किंवा अशा कोणत्याही प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. गेल्या दीड महिन्यांपासून बंगल्यात वास्तव्यास आहे. कोणत्याही प्रकारच्या अपग्रेडेशनची मागणी केलेली नाही. मुंबईकर सुज्ञ आहेत आणि खोट्या आरोपांवर विश्वास ठेवणार नाहीत,” असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेच्या नियमांनुसार कोणतेही टेंडर रद्द करण्याचा अधिकार महापौरांना नसताना, वारसा बंगल्याच्या परिसरातील नूतनीकरणाचे टेंडर रद्द करण्याची घोषणा त्यांनी नेमक्या कोणत्या कायदेशीर अधिकाराच्या आधारे केली? प्रशासनाने त्यांना चुकीचा सल्ला दिला की जाणूनबुजून दिशाभूल केली, असा गंभीर सवाल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
महापौर, नगरसेवकांची मौजमस्ती - वर्षा गायकवाड
नगरसेवकांसाठी अलिशान कार आणि आता महापौरांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचा घाट घातला आहे. चार महिन्यापूर्वीच २.४ कोटींचा खर्च करण्यात आल्यानंतर पुन्हा आलिशान सुविधांसाठी २.९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुंबईकरांच्या पैशावर मौजमस्ती करण्याचे उद्योग थांबवा, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
महापौर सुखसुविधांमध्येच अडकल्या - पेडणेकर
मुंबईकरांच्या मूलभूत नागरी समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून महापौर रितू तावडे या नोकरचाकर, मोटारगाडी आणि अधिकृत निवासस्थानाच्या सुविधांमध्येच गुरफटल्या आहेत. महापौरपदाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. महापौरपदाची अक्षरशः थट्टा होत असल्याची भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे. महापौरांना सातत्याने अडचणीत आणणे, त्यांची प्रतिमा मलिन करणे आणि त्यांना वादाच्या भोवऱ्यात ढकलणे, यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत का? या संपूर्ण प्रकारात महानगरपालिका प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद आहे, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
मुंबईकरांच्या पैशांवर सत्ताधाऱ्यांची उधळपट्टी!
एकीकडे मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते, पावसाळ्यात पाणी तुंबण्यापासून मुक्ती, दर्जेदार आरोग्य सेवा, शाळा, पदपथ, गटारे आणि इतर मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची आवश्यकता आहे; तर दुसरीकडे सत्ताधारी स्वतःच्या बंगल्यांवर, गाड्यांवर आणि सुखसोयींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यास प्राधान्य देत आहेत. जनतेच्या कराच्या पैशाचा वापर विकासासाठी की सत्ताधाऱ्यांच्या वैयक्तिक सुखसोयींसाठी, असा हल्लाबोल काँग्रेसने भाजपवर केला आहे.