Mumbai : आर्थिक शिस्तीवर लक्ष केंद्रित करा! महापौरांचे बेस्टला निर्देश

बेस्ट ही मुंबईतील प्रमुख सार्वजनिक वाहतूक आणि वीज पुरवठा संस्था आहे. बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी स्वमालकीच्या बसेसचा ताफा वाढवणे ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीनेही सकारात्मक पावले उचलली जातील.
Mumbai : आर्थिक शिस्तीवर लक्ष केंद्रित करा! महापौरांचे बेस्टला निर्देश
Mumbai : आर्थिक शिस्तीवर लक्ष केंद्रित करा! महापौरांचे बेस्टला निर्देश(Photo-X/@TawdeRitu)
Published on

मुंबई : बेस्ट ही मुंबईतील प्रमुख सार्वजनिक वाहतूक आणि वीज पुरवठा संस्था आहे. बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी स्वमालकीच्या बसेसचा ताफा वाढवणे ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीनेही सकारात्मक पावले उचलली जातील. बेस्ट प्रशासनाने आर्थिक शिस्त, उत्पन्नवाढ आणि कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे. प्रभावी व दीर्घकालीन उपाययोजना आखून सादर कराव्यात, उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले.

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची संयुक्त सभा महापालिका मुख्यालयात स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी संपन्न झाली. बेस्ट उपक्रमातील कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या, ग्रॅच्युईटी, वेतन करार, पदोन्नती, अनुकंपा तत्त्वावरील भरती, स्वमालकीच्या बसेसची उपलब्धता, अर्थसहाय्यता या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

दि बीईएसटी वर्कर्स युनियन व बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत महापौरांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच समस्यांचे निराकरण करण्याकामी आश्वस्त केले. यावेळी उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त आयुक्त (शहर) तथा बेस्ट महाव्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार) डॉ. अश्विनी जोशी, सहाय्यक महाव्यवस्थापक (विधी) राजेंद्र डुबल, मुख्य व्यवस्थापक रमेश मडावी यांच्यासह बेस्टचे संबंधित अधिकारी तसेच संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

बेस्ट कर्मचाऱ्यांबाबत पालिका संवेदनशील

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. सेवानिवृत्त कामगार व कर्मचाऱ्यांचे उपदान आणि इतर कायदेशीर देणी प्रदान करण्याबाबत संवेदनशील आहोत. ‘बेस्ट’कडे स्वतःच्या मालकीच्या बसेस असाव्यात, यासाठी प्राधान्य दिले जाईल. या संदर्भात सातत्याने बैठका घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही केली जाईल. बेस्ट प्रशासनानेदेखील प्रभावी उपाययोजना आखाव्यात, असे प्रतिपादन महापौर रितू तावडे यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in