

मुंबई : मुंबई महापौर पदाच्या निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी हे प्रधान सचिव दर्जाचा असणार आहे. नगर विकास विभागाने निवड प्रक्रियेत सुधारणा केली आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून मावळते महापौर किंवा ज्येष्ठातील ज्येष्ठ नगरसेवक अशांची निवड करण्याची तरतूद अधिनियमांमध्ये असली तरी यात आता नगरविकास खात्याने सुधारणा केली आहे.
या अधिनियांत सुधारणा करून पीठासीन अधिकारी म्हणून प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी असतील, असा बदल केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा माजी महापौर पीठासीन अधिकारी म्हणून बसण्याआधीच भाजपने त्यांची उचलबांगडीचे आदेश काढून तिथे प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला याचे अधिकार दिल्याने विरोधी पक्षांचे स्वप्न भंग केले आहे.
महापौर पदाच्या या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक म्हणून श्रध्दा जाधव यांचे नाव गृहीत धरले जात होते. पण महापालिका अधिनियमातील सुधारीत तरतुदीनुसार यासाठी प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी आता पीठासीन अधिकारी पदी बसतील हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवकांला पीठासीन अधिकारी बनवण्यात येणार नसल्याने त्यांनाही आता काही हातचलाखी करता येणार नाही.