

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या व्हीआयपी गाडीच्या टपावरील लाल दिवा उतरला आहे. मात्र गाडीच्या पुढील बाजूस महापालिकेचे बोधचिन्ह असलेल्या ठिकाणी लाल-निळ्या रंगाचे दिवे गाडीचे आकर्षण ठरले आहे. पोलिसांच्या गाडीवर सफेद-निळे दिवे झळकतात त्याप्रमाणे महापौरांची स्कॉटिंग गाडीही दिमतीला आहे. त्यामुळे लाल दिवा उतरला पण व्हीआयपी असल्याचा थाट पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीआयपी संस्कृती मोडीत काढल्याने केंद्र सरकारसह राज्यातील व्हीआयपी कारच्या टपावरील लाल दिवा उतरला. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर मुंबईच्या महापौरांच्या गाडीच्या टपावरील लाल दिव्याची बत्तीगुल झाली. व्हीव्हीआयपी पद्धत बंद असताना महापौरांच्या व्हीआयपी गाडीच्या पुढील बाजूस लाल व निळ्या रंगाचे दिवे झळकू लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील काही अतिरिक्त आयुक्तांनीही गाडीच्या टपावर अशाप्रकारे लखलखणारे दिवे लावले आहेत. आता हाच कित्ता गिरवत मुंबई शहराच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या गाडीच्या समोरील बाजूस लाल-निळ्या रंगाचे लखलखणारे दिवे बसवले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व काही मंत्र्यांप्रमाणे महापौरांना पोलीस संरक्षण नसतानाही त्यांच्या स्कॉटिंग कारच्या मागील टपावर सफेद-निळ्या रंगाचे दिवे असलेली स्कॉर्पिओ गाडी दिमतीला असते. या गाडीत सुरक्षारक्षक व महापौरांचा पीए व शिपाई असतो. त्यामुळे पुन्हा महापौरांच्या ताब्यात व्हीआयपी संस्कृती आली की काय, अशी चर्चा महापालिकेत रंगली आहे.
वाहतूककोंडीतून वाट काढण्यासाठी गाडीवर दिवे !
मुंबईच्या प्रथम नागरिक असल्यामुळे महापौरांना अनेक शासकीय व खासगी कार्यक्रमांना वेळेत पोहचावे लागते. अनेकदा कामानिमित्त मंत्रालयात जावे लागते. एवढेच काय, तर पंतप्रधान राष्ट्रपती अथवा परदेशातील महत्त्वाची व्यक्ती आली की त्यांच्या स्वागतासाठी महापौरांना विमानतळावर जावे लागते. त्यामुळे मुंबईतील वाहतूककोंडीतून मार्गक्रमण करण्यासाठी स्कॉटिंगसाठी असलेल्या गाडीच्या टपावर सफेद-निळ्या रंगाचे लखलखणारे दिवे बसवण्यात आल्याचे समजते.