

मुंबई : महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला असून अशा प्रकारचा हा तिसरा धमकीचा ई-मेल आहे. या धमकीनंतर महापालिका मुख्यालयात तातडीने महापौर कार्यालयासह मुख्यालय परिसराची पाहणी करण्यात आली.
बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ३ वाजण्याच्या सुमारास बाॅम्बस्फोट होईल, असा धमकीचा ई-मेल आला. मात्र, मी कार्यालयातच बसून आहे. मी जनतेची कामे करण्यासाठी महापौर पदावर आहे. त्यामुळे धमक्यांना घाबरत नाही, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.
धमकीच्या पार्श्वभूमीवर, महापालिका मुख्यालय आणि परिसराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
धमकीत खलिस्तान समर्थनाचा मजकूर
धमकीच्या संदेशात खलिस्तानची मागणी करणारा, समर्थन करणारा मजकूर तसेच काही प्रमुख नेत्यांनाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे ई-मेलचा स्रोत शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा, सायबर सेल आणि अन्य तपास यंत्रणांनी संयुक्त तपास सुरू केला आहे. ई-मेल कोणत्या आयपी ॲॅड्रेसवरून पाठवण्यात आला, तो देशांतर्गत की परदेशातून पाठवण्यात आला, याचाही शोध घेतला जात आहे.