

मुंबई : उपमहापौर संजय घाडी यांना भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त आयुक्त यांचा बंगला देणे गैर नाही. मुंबई महापालिकेच्या जल विभागाचे चार पाच बंगले तयार असून आयुक्तांना घाडी यांना बंगला देण्याबाबत शिफारस करणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
उपमहापौर यांना वैधानिक दर्जा नसतानाही महापौरांनी केलेल्या शिफारसमुळे वैधानिक दर्जा असलेले सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी, सुधार व शिक्षण समिती अध्यक्ष आश्चर्य चकित झाले आहेत.
महापौरांप्रमाणे आपल्यालाही राणीबागेमध्ये बंगला मिळावा, अशी मागणी उपमहापौर संजय घाडी यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून केली होती. याची प्रशासनाने दखल घेतली नसली तरी, महापौर रितू तावडे यांनी मात्र दखल घेतली आहे. सभागृहात महापौर उपस्थित नसताना उपमहापौर सभा चालवतात. त्यामुळे त्यांना महापालिकेतर्फे निवासस्थान मिळायला हवे.
मुंबई महापौरांना वैधानिक दर्जा असून त्यांना एक विशेष महत्त्व आहे. पालिकेच्या अधिनियमात उपमहापौर या पदाला मंजुरी आहे. पण त्याला वैधानिक दर्जा नाही. त्यामुळे त्यांना महापौरांप्रमाणे महागडी गाडी, दालन, सुरक्षारक्षक, बंगला, सेवेसाठी कर्मचारी देणे शक्य नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.