
मुंबई : मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या आणि अन्य अधिकाऱ्यांच्या ५८७ जागा रिक्त आहेत. यापैकी ३४७ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. ही पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्याची कार्यवाही करणार असल्याचे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.
मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात चार वैद्यकीय महाविद्यालये आहेत, तर एक दंतमहाविद्यालय आहे. शेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयात ३०८ पदे मंजूर असून ७३ भरलेली आहेत, तर २३५ रिक्त आहेत. लोकमान्य टिळक महाविद्यालयात २३० पदे मंजूर असून ७२ भरलेली आहेत, तर १५८ रिक्त आहेत. टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयात १८३ पदे मंजूर असून ५२ भरलेली आहेत, तर १३१ रिक्त आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयात ६८ पदे मंजूर असून १७ भरलेली आहेत, तर ५१ पदे रिक्त आहेत. नायर दंत महाविद्यालयात ३२ पदे मंजूर असून २० भरलेली आहेत, तर १२ पदे रिक्त आहेत. अशा एकूण ८२१ पदांपैकी ५८७ पदे रिक्त आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
..त्याचवेळी शासनाचे नियम बदलावेत
नॅशनल मेडिकल कौन्सिलचे नियम दर तीन महिन्यांनी बदलतात. हे नियम शासनाच्या नियमात समाविष्ट करण्यासाठी पुन्हा तीन महिने लागतात. त्यामुळे महापालिकेला निर्देश देण्यात येत आहेत की, नॅशनल मेडिकल कौन्सिलचे नियम बदलतील त्याचवेळी शासनाचे नियम बदलतील यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी बिल आणावे लागले तरी चालेल. त्याचा आपण पाठपुरावा करू, असे उदय सामंत म्हणाले.